Venkaiah Naidu Covid Positive : उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांना कोरोनाची लागण झाली आहे. व्यंकय्या नायडू सध्या हैदराबादमध्ये आहेत. त्यांनी एक आठवडाभर घरातच विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला आहे. संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करुन घेण्याचं आवाहनही व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी ट्विट करत आपला कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं सांगितलं. तसेच संपर्कात आलेल्या सर्वांनी आठडाभर स्वत:ला विलगीकरणात ठेवावं असेही व्यंकय्या नायडू यांनी सांगितलेय.

  






देशात सलग दुसऱ्या दिवशी नव्या कोरोनारुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं पाहायला मिळालं आहे. देशात कालच्या तुलनेत आज प्राणघातक कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे तीन लाख 33 हजार 533 नवीन रुग्ण आढळले असून 525 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील दैनंदिन रुग्णवाढीचा दर 17.78 टक्के इतका झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे कालच्या तुलनेत देशात चार हजार 171 कमी रुग्ण आढळले आहेत. आदल्या दिवशी कोरोनाचे तीन लाख 37 हजार 704 रुग्ण आढळले होते. जाणून घ्या देशातील कोरोनाची ताजी स्थिती काय आहे.


सक्रिय कोरोनारुग्णांची संख्या 21 लाख 87 हजार 205 - 
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशातील सक्रिय कोरोनारुग्णांची संख्या 21 लाख 87 हजार 205 झाली आहे. त्याचबरोबर या साथीमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या चार लाख 89 हजार 409 झाली आहे. आकडेवारीनुसार, शनिवारी दिवसभरात दोन लाख 59 हजार 168 लोक बरे झाले, त्यानंतर आतापर्यंत तीन कोटी 65 लाख 60 हजार 650 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.


मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live