Vice President Election 2022 : देशाच्या उपराष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक होत आहे. एनडीएकडून जगदीप धनखड तर विरोधी पक्षाकडून मार्गारेट अल्वा यांच्यात ही लढत होणार आहे.  उपराष्ट्रपतीपदासाठीचे मतदान पूर्ण झाले असून थोड्याच वेळात मतमोजणीला सुरूवात होणार आहे. 


सध्याचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्टला संपतोय. त्यामुळे 11 ऑगस्टला नवे उपराष्ट्रपती शपथ घेतील. सकाळी 10 वाजल्यापासून उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली होती. त्यामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्य मतदान केले आहे. यूपीएने उमेदवार ठरवताना विश्वासात घेतलं नसल्याचा आरोप करत तृणमूल काँग्रेसने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतलाय. तर उद्धव ठाकरे यांनी मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा दर्शवलाय. त्यामुळे शिंदे गटाचे खासदार कोणती भूमिका घेणार याची उत्सुकता आहे. या निवडणुकीत धनखड यांचं पारडं जड मानलं जातंय. संध्याकाळी  7 वाजेपर्यंत मतमोजणी पूर्ण होऊन निकाल लागेल असा अंदाज आहे.


लोकसभेत भाजपचे एकूण 303 आहेत. खासदार संजय धोत्रे प्रकृती अस्वास्थ्यामुळे येऊ शकणार नाहीत. अशा प्रकारे लोकसभेत एनडीएचे एकूण 336 सदस्य आहेत. तसेच, राज्यसभेत भाजपचे 91 (4 नामनिर्देशित सदस्यांसह) सदस्य आहेत आणि एनडीएचे एकूण 109 सदस्य आहेत. अशा परिस्थितीत आता एनडीएचे दोन्ही सभागृहात एकूण 445 सदस्य आहेत. एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड यांना YSRCP, BSP, TDP, BJD, AIADMK, शिवसेना इत्यादी विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. इलेक्टोरल कॉलेजच्या आकडेवारीनुसार, धनखड यांच्या बाजूनं दोन तृतीयांश मतं आहेत. आकडेवारीचा विचार करता धनखड यांचा विजय निश्चित वाटतो.


जगदीप धनखड यांना जवळपास 515 मतं मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, अल्वा यांना आतापर्यंत मिळालेला पक्षांचा पाठिंबा लक्षात घेता त्यांना जवळपास 200 मतं मिळतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसनं अल्वा यांच्या नावाच्या घोषणेपूर्वी एकमत न होण्याच्या प्रयत्नांचा हवाला देत मतदान प्रक्रियेपासून दूर राहण्याची घोषणा केल्यानं उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरून विरोधी पक्षांमध्येही मतभेद निर्माण झाले आहेत.


जगदीप धनखड हे 71 वर्षांचे असून ते राजस्थानमधील प्रभावशाली जाट समाजातील आहेत. त्यांची पार्श्वभूमी समाजवादी आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार होण्यापूर्वी ते पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. धनखड यांची उपराष्ट्रपतीपदी निवड झाली, तर लोकसभेचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे अध्यक्ष एकाच राज्याचे असतील, हा योगायोग म्हणावा लागेल. सध्या ओम बिर्ला हे लोकसभेचे अध्यक्ष आहेत आणि ते राजस्थानच्या कोटा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष देखील असतात. 


मार्गारेट अल्वा या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या असून त्यांनी राजस्थानच्या राज्यपाल म्हणूनही काम पाहिलं आहे. तेलंगना राष्ट्र समिती (TRS), आम आदमी पार्टी (AAP) आणि झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) यांनी अल्वा यांना पाठिंबा जाहीर केला आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) नेही अल्वा यांना पाठिंबा दिला आहे.