नवी दिल्ली : देशाचे पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून माजी केंद्रीय मंत्री आणि एनडीएचे उमेदवार व्यंकय्या नायडूंची निवड झाली. यूपीएच्या गोपाळकृष्ण गांधी यांचा पराभव करत व्यंकय्या नायडूंनी उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली.

व्यंकय्या नायडूंना 516 तर गोपाळकृष्ण गांधींना 244 मतं मिळाली. दरम्यान उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी 785 पैकी 771 खासदारांनी मतदान केलं. त्यापैकी 11 मतं बाद ठरवण्यात आली.

11 ऑगस्टला व्यंकय्या नायडू उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेतील. देशाचे मावळते राष्ट्रपती हमीद अन्सारींचा कार्यकाळ 10 ऑगस्टला पूर्ण होत आहे. व्यंकय्या नायडूंच्या विजयानंतर आंध्र प्रदेशमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला.

या विजयानंतर व्यंकय्या नायडूंनी सर्व खासदारांचे आभार मानले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी व्यंकय्या नायडूंचं अभिनंदन केलं आणि शुभेच्छा दिल्या.

व्यंकय्या नायडू यांचा अल्प परिचय

व्यंकय्या नायडू हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. मोदी सरकारमध्ये नायडूंकडे नगरविकास मंत्रालय, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची जबाबदारी आहे. त्यांनी 2002 ते 2004 या काळात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं आहे.

पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात नायडूंकडे ग्रामविकास मंत्रालयाची जबाबदारी होती. दक्षिण भारतातील भाजपचे महत्वाचे नेते म्हणून व्यंकय्या नायडूंकडे पाहिलं जातं. नायडूंना 25 वर्षांपेक्षा जास्त काळाचा संसदीय कामकाजाचा अनुभव आहे.