काँग्रेस नेत्यांनीही या हल्ल्याप्रकरणी भाजपवर थेट आरोप केला आहे. मात्र भाजपने या आरोपांचं खंडण केलं आहे. राहुल गांधींवरील हल्ला हा जीवघेणा होता, असं काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला आणि राज्यसभा खासदार गुलाम नबी आझाद यांनी म्हटलं आहे.
गुजरातमधील बनासकांठा इथं राहुल गांधींच्या गाडीवर दगडफेक झाली. या दगडफेकीत राहुल गांधींच्या कारच्या मागच्या बाजूच्या काचा फुटल्या. इतकंच नाही तर राहुल गांधींना काळे झेंडेही दाखवण्यात आले.
दरम्यान, भाजपच्या गुंडांनी ही दगडफेक केल्याचा दावा काँग्रेसने केला. तर काळे झेंडे दाखवणाऱ्यांना घाबरत नाही, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली.
सध्या गुजरातमध्ये महापुराने थैमान घातलं आहे. आतापर्यंत 218 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 61 जण हे बनासकंठातील आहेत. या भागाचीच पाहणी करण्यासाठी राहुल गांधी गेले होते. त्यावेळी हा हल्ला झाला.