नवी दिल्ली : वरिष्ठ वृत्तनिवेदक रोहित सरदाना यांचं निधन झालं. रोहित सरदाना यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यावर उपचार सुरु असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर मीडिया विश्वास शोककळा पसरली आहे. अनेक पत्रकारांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. पत्रकारांसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनीही दु:ख व्यक्त केलं आहे.


कोरोनाचा संसर्ग झालेल्या रोहित सरदाना यांना आज (30 एप्रिल) सकाळी हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. परंतु त्यांना वाचवण्यात अपयश आलं. रोहित सरदाना यांनी जगाचा निरोप घेतला असला तरी मृत्यूच्या एक दिवस आधी ते लोकांची मदत करत होते. कोरोनाची लागण झालेल्या नागरिकांच्या उपचारासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेडच्या सोयीसाठी ते सोशल मीडियावर सक्रिय होते आणि सहकार्याचं आवाहन करत होते. इतकंच नाही तर 29 एप्रिललाही म्हणजे मृत्यूच्या एक दिवस आधी ट्वीट करुन त्यांनी एका महिलेसाठी रेमडेसिवीर इंजेक्शनची सोय करण्याचं आवाहन केलं होतं. त्याआधी 28 एप्रिल रोजी त्यांनी लोकांना प्लाझ्मा दान करण्याचं आवाहन केलं होतं.


रोहित सरदाना सध्या आज तकमध्ये वृत्तनिवेदक म्हणून काम करत होते. आजतक वरुन दंगल या शोचं अँकरिंग ते करत होते. तर अनेक वर्षांपासून ते झी न्यूजमध्ये वृत्तनिवेदक होते. 2018 मध्ये रोहित सरदाना यांना गणेश शंकर विद्यार्थी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.


रोहित सरदाना यांच्या निधनावर वरिष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी ट्विटरवर लिहिलं आहे की, "अतिशय धक्कादायक बातमी आहे. प्रसिद्ध टीव्ही न्यूज अँकर रोहित सरदाना यांचं निधन झालं. आज सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन."