भुवनेश्वर : गोरक्षेच्या नावाखाली माणसांचे जीव घेतल्याच्या घटना समोर येत असतानाच ओदिशात भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या ताफ्यातील गाडीनेच गायीला धडक दिल्याचा प्रकार घडला आहे. यानंतर शाह यांच्यावर बीजेडीच्या खासदाराने उपरोधिक टिप्पणी केली आहे.


ओदिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या रॅलीत अमित शाह सहभागी झाले होते. रॅलीतील एका वाहनाने गायीला धडक दिल्यामुळे ती जखमी झाली. याच घटनेचा आधार घेत सत्ताधारी बीजेडी (बिजू जनता दलाचे) नेते तथागत सत्पथी यांनी ट्वीट करुन टोला हाणला.

'अमित शाहांच्या ताफ्यातील गाडीने गायीला धडक दिली. गाय जखमी झाली. होली काऊ' असं ट्वीट सत्पथी यांनी केलं.

बुधवारी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 5 वर बंडालोजवळ हा अपघात झाला. रस्ता ओलांडणाऱ्या गायीला शाहांच्या ताफ्यातील वाहनाने धडक दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपघातात गाय जखमी झाली, त्याचप्रमाणे कारचंही नुकसान झालं. अमित शाह असलेली गाडी मात्र पुढे निघून गेली होती. गायीवर उपचारासाठी योग्य ती मदत केल्याचं भाजपतर्फे सांगण्यात आलं.