नवी दिल्ली : मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या कार्यकाळातही कामाचा सपाटा सुरुच ठेवला आहे. अर्थ मंत्रालयातील 12 उच्चपदस्थ आयकर अधिकाऱ्यांना सरकारने घरी पाठवलं आहे. सक्तीची निवृत्ती घेण्यास भाग पाडत या अधिकाऱ्यांना सरकारने घरचा रस्ता दाखवला आहे. सरकारने घरी पाठवलेल्या आयकर अधिकाऱ्यांमध्ये चीफ कमिश्नर, प्रिन्सिपल कमिश्नर आणि कमिश्नर पातळीच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.


या सर्व अधिकाऱ्यांना डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड अडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्सच्या नियम 56 अंतर्गत कामावरुन कमी करण्यात आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अर्थ मंत्रालय या अधिकाऱ्यांच्या कामकाजावर नाखुष होतं. यातील काही अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचार, बेहिशेबी मालमत्ता, तसंच लैंगिक शोषणाचे आरोपही होते.

मोदी सरकारने घरी पाठवलेल्या अधिकाऱ्यांमध्ये अशोक अग्रवाल, एसके श्रीवास्तव, होमी राजवंश, बीबी राजेंद्र प्रसाद, अजॉय कुमार सिंह, बी अरुलप्पा, आलोक कुमार मित्रा, चांदर सेन भारती, अंडासू रवींद्र, विवेक बत्रा, स्वेताभ सुमन आणि राम कुमार भार्गव यांचा समावेश आहे.