नवी दिल्ली : भारतीय वायूदलाच्या बेपत्ता एएन 32 (AN-32) विमानाचे अवशेष अरुणाचल प्रदेशातील लिपो भागात दिसल्याची माहिती आहे. सैन्याच्या Mi 17 हेलिकॉप्टरने या विमानाच्या अवशेषाचे तुकडे टिपले आहेत. आसामच्या जोरहाटमधून तीन जूनला 13 प्रवाशांसह निघालेलं एएन 32 विमान रडारवरुन गायब झाल्यापासून संपर्काबाहेर होतं.

गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता विमानाचा शोध सुरु असतानाच अखेर नको असलेली बातमी समोर आली. एएन 32 विमानाचे अवशेष लिपोपासून उत्तरेला 16 किलोमीटरवर, तर अरुणाचल प्रदेशातील तातोपासून ईशान्येकडे 12 हजार फूट उंचावर आढळले आहेत.

3 जून रोजी आसाममधील जोरहाटहून अरुणाचल प्रदेशातील दुर्गम भागात असलेल्या मेनचुका इथे जाण्यासाठी हे विमान दुपारी 12.25 वाजता निघालं होतं. मात्र पुढच्या 35 मिनिटांतच रडारशी संपर्क तुटला होता. त्यानंतर भारतीय सैन्यदलाकडून युद्धपातळीवर विमानाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरु होते.

वायुसेनेचं बेपत्ता विमान | पत्नीच्या डोळ्यांदेखत पायलट पतीचं विमान रडारवरुन गायब



जुलै 2016 मध्ये एएन 32 प्रकारचंच एक विमान 29 प्रवाशांसह बंगालच्या उपसागरात कोसळलं होतं. ते विमान चेन्नईहून पोर्ट ब्लेअरला निघालं होतं. रशियन बनावटीची एएन 32 विमानं 80 च्या दशकाच्या सुरुवातीला भारतात आणण्यात आली होती. भारतीय वायुदलात जवळपास 100 एएन 32 विमानं सेवेत आहेत.