Rajasthan New CM Bhajanlal Sharma : भाजपने सर्वांना धक्का देत राजस्थानची कमान भजनलाल शर्मा (Bhajanlal Sharma) यांच्याकडे सोपावली आहे. भजनलाल शर्मा यांच्या नावाची घोषणा करण्यासाठी जयपूर येथील भाजप कार्यालयात विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. बैठकीत निरीक्षक राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांच्यासह माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे (Vasundhara Raje) आणि इतर ज्येष्ठ नेते मंचावर उपस्थित होते. त्यावेळी भजनलाल शर्मा यांच्या नावाची चिठ्ठी वसुंधराराजे यांनी उघडली आणि त्यांना धक्काच बसला. त्यावेळचा एक व्हिडीओ आता व्हायरल (Vasundhara Raje Viral Video) होत आहे. 


मुख्यमंत्रिपदासाठी नाव घोषित करण्यासाठी आज जयपूरमध्ये भाजपची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी राजनाथ सिंह, भाजपचे इतर केंद्रीय निरीक्षक आणि वसुंधराराजे एकत्र आले. तेव्हा वसुंधराराजे यांच्या डाव्या हातात मोबाईलसह चिठ्ठी होती. खुर्चीवर बसल्यानंतर वसुंधरा यांनी राजनाथ सिंह यांना काहीतरी विचारले. यानंतर वसुंधराराजे यांनी चिठ्ठी उघडली आणि त्यानंतर त्यांच्या चेहऱ्याचा रंगच बदलला.


 






वसुंधराराजे यांच्या हातात असलेल्या चिठ्ठीमध्ये भजनलाल शर्मा यांचे नाव लिहिले होते. वास्तविक वसुंधराराजे या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर मानल्या जात होत्या. पण त्यांना भाजपने संधी दिली नाही आणि पहिल्यांदाच आमदार झालेल्या भजनलाल शर्मा यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाचा माळ पडली.


वसुंधराराजे यांचे शक्तिप्रदर्शन


राजस्थानच्या निवडणुकीचा निकाल आल्यापासून वसुंधराराजे यांनी आपली ताकद दाखविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. 4 आणि 5 डिसेंबर रोजी त्यांनी जयपूरमध्ये त्यांच्या निकटवर्तीय आमदारांची बैठक घेतली. त्यानंतर त्या दिल्लीला पोहोचल्या. त्या ठिकाणी त्यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. दिल्लीहून परतल्यानंतरही वसुंधराराजे यांनी जयपूरमध्ये आमदारांची भेट घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपने वसुंधराराजे यांना विधानसभा अध्यक्ष बनवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. पण त्यांनी त्याला नकार दिला.


विरोधकांचे टोमणे


वसुंधराराजे यांच्या प्रतिक्रियेवर विरोधी पक्षांनी टोला लगावला आहे. युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बीवी यांनी सोशल मीडियावर त्याचा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं आहे की, "अक्कड बक्कड बंबे बो...". तर काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की, माजी मुख्यमंत्र्यांसाठी हा धक्कादायक क्षण होता.


चिठ्ठी उघडल्यानंतर वसुंधराराजे यांनी भजनलाल शर्मा यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. किंबहुना ज्येष्ठ नेत्याच्या जागी नवीन नेत्याला मुख्यमंत्री करायचे असेल तर त्या ज्येष्ठ नेत्याकडून त्याचे नाव सुचवले जाते, अशी परंपरा भाजपमध्ये पाहायला मिळते. छत्तीसगडमध्ये विष्णुदेव साय यांच्या नावाचा प्रस्ताव रमण सिंह यांनी तर मध्य प्रदेशमध्ये मोहन यादव यांच्या नावाचा प्रस्ताव शिवराज सिंह चौहान यांनी ठेवला होता.


ही बातमी वाचा: