नवी दिल्ली : भाजप खासदार वरुण गांधी यांनी आरक्षणाची मागणी केली आहे. मात्र, त्यांनी आरक्षण कोणत्या जाती किंवा धर्मासाठी नव्हे, तर देशातील तरुणांसाठी मागितलं आहे. राजकारणात चाळीसहून कमी वयातील तरुणांसाठी 20 टक्के आरक्षणाची मागणी वरुण गांधी यांनी केली आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणूक वगळून ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि नगर परिषदेत कमीत कमी 20 टक्के जागा या केवळ 40 हून कमी वयाच्या तरुणांची आरक्षित असायला पाहिजेत, अशी मागणी भाजप खासदार वरुण गांधी यांनी केली आहे.
तरुणांसाठीच्या या आरक्षणाला कोणत्याही जाती-धर्माचं बंधन नसावं आणि 40 हून कमी वय असलेल्या तरुणांनाच आरक्षण मिळावं, असं वरुण गांधी यांचं म्हणणं आहे.
“आजच्या घडीला अनेक तरुणांना राजकारणात यायचं आहे. मात्र, ज्यांच्या कुटुंबाला राजकारणाची पार्श्वभूमी आहे, असेच तरुणा राजकारणात येतात. गरीब किंवा मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुण राजकारणात येत नाहीत.”, असे वरुण गांधी यांचं मत आहे.
आपण गेल्या दोन वेळेपासून खासदार आहोत, तेही पूर्वजांच्या नावामुळेच. जर माझ्या नावात ‘गांधी’ नसतं, तर दुसऱ्या नेत्यांच्या भाषणावर टाळ्या वाजवतच बसलो असतो, असेही वरुण गांधी म्हणाले.
“राजकारण एक विशिष्ट वय ओलांडून गेल्यानंतर आल्यावर ती व्यक्ती थकून गेलेली असते. त्यामुळे राजकारणात नवे काही प्रयोग ती व्यक्ती करत नाही. त्यामुळे ग्राम पंचायत, बीडीसी मेंबर, महापालिका नगरसेवक, परिषदा इत्यादींमध्ये तरुणांना स्थान दिलं पाहिजे. तर ते लवकरात लवकर राजकारणातील उंच शिखरावर पोहोचतील”, असेही वरुण गांधी यांचं म्हणणं आहे.