लखनौ : उत्तर प्रदेशातल्या वाराणसीत पूल कोसळून काल 18 निष्पाप नागरिकांचा जीव गेला. डोळ्यांनी बघवणार नाही असं चित्र काल वाराणसीत होतं. पूलाच्या कोसळलेल्या पिलरच्या खाली अनेक गाड्या आणि परिणामी लोकही चिरडले गेले. मात्र त्याहूनही भयानक प्रकार घडल्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे, जो पाहून कोणाचाही माणुसकीवरचा विश्वासच उडेल.


'एका पोस्टमॉर्टमसाठी 600 रुपये द्या' अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांकडे होत असल्याचा व्हिडिओ पाहायला मिळत आहे. यामुळे वाराणसीतील आरोग्य विभागाचे धिंडवडे उडाले आहेत.

केंट रेल्वे स्टेशनजवळ पूल कोसळून 18 निष्पापांचा बळी गेला. पण मृतांच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्या या नराधमांनी शवविच्छेदनासाठी कुटुंबीयांकडून चक्क तीनशे ते सहाशे रुपयांची मागणी केली.

कोणीतरी एकाचवेळी आपल्या कुटुंबातल्या पाच जणांना गमावून बसलं होतं, कोणी बाहेरगावाहून आलं होतं, तर कोणाचं पाकीटच हरवलं होतं. मात्र जोपर्यंत पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत मृतदेह शवविच्छेदनासाठी उचलणार नाही, अशी संतापजनक उत्तरं माणसाची फक्त कातडी चढवलेल्या या जनावरांनी दिली.

घटनेनंतर प्रशासनानं कर्मचाऱ्याला निलंबित करत गुन्हा दाखल करण्याच सौजन्य दाखवलं. मात्र लोकांना अशा अवस्थेत खिंडीत गाठून, त्यांच्या भावनांशी इतक्या क्रूरपणे खेळणाऱ्यांना निलंबित करुन कुटुंबीयांना न्याय मिळेल का? हा प्रश्न कायम आहे.