कर्नाटक विधानसभा निवडणूक - बंगळुरु : कर्नाटकमध्ये सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपाल वजूभाई वाला यांनी आमंत्रण दिलं आहे. त्यामुळे काँग्रेस-जेडीएसची सरकार स्थापन करण्याची स्वप्नं धुळीला मिळण्याची शक्यता आहे.


भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार येडियुरप्पा उद्या म्हणजेच गुरुवारी सकाळी कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधीसाठी योग्य तारीख, वेळ आणि जागा कळवण्यास राज्यपालांनी भाजपला पत्राद्वारे कळवलं होतं.


त्यानंतर येडियुरप्पा राजभवनात सकाळी 9 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, असं ट्वीट भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन करण्यात आलं.

बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपला 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.


खरं तर गोवा, मेघालय आणि मणिपूर या राज्यांमध्ये झालेल्या सत्तास्थापनेच्या धर्तीवर झालेल्या निर्णयांच्या आधारे बहुमताचा आकडा असलेल्या पक्षांना सत्तास्थापनेसाठी आमंत्रण दिलं जावं अशी मागणी काँग्रेस आणि जेडीएसनं केली होती.

दरम्यान, कर्नाटकच्या राज्यपालांच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे. सर्वोच्च न्यायालयाने तयारी दर्शवल्यास अभिषेक मनू सिंघवी काँग्रेसतर्फे बाजू मांडणार.
भाजपचं मन की बात आता 'धन की बात' झालं : काँग्रेस

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने कर्नाटकात मोठा पेच निर्माण झाला आहे. बहुमताचा 112 आकडा कोणालाही गाठता आला नाही. भाजप हा 104 जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

काँग्रेसला एकूण 78 आणि जेडीएस 38 जागा मिळाल्या आहेत. मात्र काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा देऊन सत्ता स्थापन करण्यासाठी मोकळीक दिली होती. त्यामुळे काँग्रेस आणि जेडीएसकडे मिळून 116 आमदारांचं बळ आहे.

राज्यपालांनी भाजपला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिल्याचा दावा भाजपचे आमदार सुरेश कुमार यांनी केला होता. त्यानंतर भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन येडियुरप्पांच्या शपथविधीबाबत ट्वीट करण्यात आलं होतं, मात्र ते डीलीट करण्यात आलं.


काँग्रेस-जेडीएसने राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला होता. आपल्याकडे पुरेसे संख्याबळ असल्याचा दावा जेडीएस नेते कुमारस्वामी यांनी केला होता. सत्तास्थापनेची संधी देण्याची मागणी केल्यानंतर राज्यपालांनी कुमारस्वामींना कायदेशीर मार्गाने तोडगा काढण्याची हमी दिली होती. जेडीएसच्या विधीमंडळ नेतेपदी एचडी कुमारस्वामी यांची निवड करण्यात आली होती.

कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018



    • भाजप 104

    • काँग्रेस 78

    • जनता दल (सेक्युलर) 37

    • बहुजन समाज पार्टी 1

    • कर्नाटक प्रज्ञावंत जनता पार्टी 1

    • अपक्ष 1