नवी दिल्ली : कोरोना व्हायरसवरील दोन लसींना केंद्र सरकारने मान्यता दिल्यानंतर लसीकरण कधी सुरु होणार याबाबत देशभरात चर्चा सुरु होती. येत्या 16 जानेवारीपासून भारतात लसीकरणाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून लसीकरणाची रंगीत तालीम देशभर सुरु होती. दोन टप्प्यात ड्राय रन घेण्यात आलं होतं. त्यानंतर आता प्रत्यक्षात लसीकरणाला सुरुवात होत आहे.

Continues below advertisement


आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि प्रत्यक्ष आघाडीवर कार्यरत असणाऱ्या कोविड योध्यांना प्राधान्याने लसीकरण करण्यात येणार आहे, साधारणपणे 3 कोटी इतकी ही संख्या आहे. त्या खालोखाल 50 वर्षांवरील व्यक्ती आणि 50 वर्षाखालील काही इतर आजार असलेल्या व्यक्तींना  लसीकरण केले जाईल, ही संख्या अंदाजे 27 कोटी आहे, अशांना  लसीकरण दिले जाईल.


कोविड 19 लसीकरणाबाबत राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीला कॅबिनेट सचिव व आरोग्य सचिवांखेरीज इतर अधिकारी उपस्थित होते. या आढावा बैठकीनंतर लसीकरणाची तारीख निश्चित करण्यात आली. काल म्हणजे शुक्रवारी संपूर्ण देशात दुसऱ्यांदा ड्राय रन घेण्यात आलं. या दरम्यान लसीची तयारीचा आढावाही घेण्यात आला.


पंतप्रधानांना को-विन लसीच्या वितरणाच्या व्यवस्थापन पद्धतीची यावेळी माहिती देण्यात आली. लसीकरणाचा साठा, त्यांच्या साठवणुकीचे तापमान आणि कोविड – 19 ची लस घेणाऱ्या लाभार्थ्यांचा वैयक्तिक पाठपुरावा अशी सर्व माहिती युनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पुरविली जाणार आहे. हा प्लॅटफॉर्म पूर्व नोंदणीकृत लाभार्थ्यांचे स्वयंचलित सत्र वाटप, त्यांची पडताळणी आणि लसीचे वेळापत्रक यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर डिजिटल प्रमाणपत्र तयार करण्यासाठी सर्व स्तरातील कार्यक्रम व्यवस्थापकांना मदत करणार आहे. या फ्लॅटफॉर्मवर 79 लाख लाभार्थ्यांपेक्षा अधिक जणांनी यापूर्वीच नोंद केली आहे.


लस टोचणारे आणि लसीकरण कार्यक्रम राबवणारे हे या व्यवस्थेचा महत्त्वपूर्ण आधारस्तंभ असल्याने, त्यांच्या प्रशिक्षण प्रक्रियेचा तपशील देण्यात आला. राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षणादरम्यान 2,360 सहभागींना प्रशिक्षण देण्यात आले, ज्यात राज्य लसीकरण अधिकारी, कोल्ड चैन अधिकारी, आयईसी अधिकारी, विकास भागीदार आदींचा समावेश होता. राज्य, जिल्हा आणि गट पातळीवर 61,000 पेक्षा अधिक कार्यक्रम व्यवस्थापक, 2 लाख लस टोचणारे आणि 3.7 लाख लसीकरण गटातील अन्य सदस्य यांना लस देण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे.


पंतप्रधानांची सर्व मुख्यमंत्र्यांसोबत 11 जानेवारीला बैठक


पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 जानेवारी रोजी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. परंतु त्याआधी लसीकरणाची तारीख जाहीर झाली आहे. या व्यतिरिक्त, लोकांमध्ये लसीसंबंधीची भीती दूर करण्यासाठी सत्ताधारी भाजप मोठ्या प्रमाणात मोहीम राबवत आहे.


दोन लसींना आपात्कालीन स्थितीत वापरण्यास परवानगी


देशात सध्या भारत बायोटेकच्या 'कोवॅक्सिन' आणि ऑक्सफोर्ड अ‍ॅस्ट्रॅजेनेकाची 'कोविशिल्ड' या लसींना 3 जानेवारीपासून आपत्कालीन वापरासाठी मंजूर देण्यात आली आहे. कोविशिल्डची निर्मिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया करत आहे.