नैनिताल : उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे हाहाकार माजला आहे. नैनिताल, हरिद्वारमध्ये नद्यांना पूर आला असतानाच बस पाण्यात पडून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर उत्तराखंडमधील मृतांचा आकडा 15 वर गेल्याची माहिती 'स्कायमेट वेदर'ने दिली आहे.


 
गलिया मार्ग या ठिकाणी नाल्याचं पाणी पुलावरुन वाहू लागल्यानं प्रवाशांनी भरलेल्या बसला पाण्यातून वाट काढणं कठीण होत होतं. पाण्यामुळे रस्त्यांना तडे गेल्याने प्रवाशांची एक बस पाण्यात पडली. बसमध्ये 35 प्रवासी प्रवास करत होते, त्यापैकी एका महिलेचा मृत्यू झाला तर इतर प्रवाशांना वाचवण्यात आलं आहे.

 
नैनितालमध्ये कालाढूंगीजवळ एका दुचाकीस्वारनं पाण्याच्या जोरदार प्रवाहात रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्याचा तोल गेला आणि तो पाण्यात पडला, मात्र सुदैवाने स्थानिकांनी त्याला वाचवलं. दुसरीकडे कुमाऊं नदीनंही रौद्र रूप धारण केल्यानं अनेक भागांना पुराचा फटका बसलाय.