उत्तराखंडमध्ये ढगफुटी, 30 जणांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 01 Jul 2016 09:50 AM (IST)
देहरादून: उत्तराखंडमध्ये ढगफुटी झाल्याने अलकनंदा नदीला आलेल्या पुरात 30 जणांचा बळी गेला आहे. तर अनेकजण जखमी आहेत. तीन वर्षांपूर्वी पुराच्या पाण्यानं उत्तराखंडमध्ये जसा हाहाकार माजवला होता, तशीच काहीशी परिस्थिती आज उत्तराखंडच्या चामोली आणि पिठोडगढमध्ये निर्माण झाली आहे. चामोली जिल्ह्यातील नंदप्रयाग घाट भागात ढगफुटीने जन-जीवन अक्षरशः विस्कटून गेलं. अलंकनंदा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे लोकांच्या घरातही पुराचं पाणी शिरलं. अनेक भागातल्या घरांच्या भिंतीही कोसळल्यामुळे लोकांनी आता गच्चीचा आसरा घेतला आहे. मात्र पाऊस असाच सुरू राहिला तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते हे लक्षात घेऊन प्रशासनानं बचावकार्याला सुरूवात केली आहे.