उत्तरप्रदेशात पुन्हा रेल्वे दुर्घटना, कैफियत एक्स्प्रेस घसरली
एबीपी माझा वेब टीम | 23 Aug 2017 07:39 AM (IST)
उत्तरप्रदेशमधील उत्कल एक्सप्रेसचा अपघाताची घटना ताजी असतानाच काल मध्यरात्री कैफियत एक्सप्रेसचेही 10 डबे रुळावरुन घसरले. या अपघातात 50 प्रवासी जखमी झाले आहेत. वारंवार होणाऱ्या रेल्वे अपघातामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
आझमगड : उत्तरप्रदेशात एका आठवड्यात सलग दुसरा मोठा रेल्वे अपघात झाला आहे. दिल्लीहून आझमगडला जाणारी कैफियत एक्स्प्रेस डंपरला धडकली. यामुळे रेल्वे इंजिनसह 10 डबे रुळावरुन घसरले यामध्ये तब्बल 50 जण जखमी झाले आहेत. अरैया जिल्ह्यातील अछल्दा आणि पाता रेल्वे स्टेशनदरम्यान ट्रेन रुळावरुन घसरली. ही दुर्घटना पहाटे 2 वाजून 30 मिनिटांनी घडली. रेल्वे प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू असून रेल्वेचे सर्व अधिकारी घटनास्थळी पोहोचल्याची माहिती मिळते आहे. तर सर्व जखमींना जवळच्याच रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी या अपघाताबाबत ट्विरवरुन माहिती दिली. 'तेथील परिस्थितीवर मी स्वत: लक्ष ठेऊन आहे. बचावकार्य सुरु आहे. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहचण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या अपघातात काहीजण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.' या अपघाताबाबत माहिती देताना रेल्वे अधिकारी अनिल सक्सेना यांनी सांगितलं की, 'कैफीयत एक्सप्रेस जेव्हा पाता रेल्वे स्टेशनवरुन जात होती त्यावेळी एका डंपरनं ट्रेनला धडक दिली. त्यामुळे ही एक्सप्रेस रुळावरुन घसरली.'