बेळगाव : लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता द्यावी आणि जैन, शीख समाजाप्रमाणे असणारे अधिकार द्यावेत, या मागणीसाठी बेळगावात अनेक ठिकाणाहून आलेल्या पन्नासहून अधिक मठाधीशांच्या नेतृत्वाखाली महारॅली काढण्यात आली. महारॅलीत राज्यभरातून आलेले हजारो लिंगायत बांधव-भगिनी सहभागी झाले होते.


धर्मवीर संभाजी चौकातून निघालेल्या महारॅलीत गांधी टोपी घालून आणि हातात भगवा ध्वज घेऊन सहभागी झाले होते. लिंगराज कॉलेजच्या मैदानावर राज्यातून आलेल्या पन्नासहून अधिक मठाधीशांच्या आणि नेते मंडळींच्या उपस्थितीत महारॅलीत सहभागी झालेल्या लिंगायत समाजाच्या व्यक्तींना मार्गदर्शन करण्यात आले.



लिंगायत आणि वीरशैव धर्म हे वेगवेगळे आहेत. बाराव्या शतकात बसवेश्वरांनी स्थापन केलेला लिंगायत धर्म हा पूर्णपणे वेगळा आहे. राज्य सरकारने लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता देण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करावी अशी मागणीही मठाधीशानी प्रचंड जनसमुदायासमोर केले.

“गेल्या 900 वर्षांपासून आम्ही हिंदू धर्मापासून वेगळे आहोत. आजही आम्ही हिंदू धर्माबाहेर आहोत. आम्ही हिंदुविरोधी नाही. आम्ही लिंगायतच, आम्ही हिंदू नव्हे. संत बसवेश्वरांनी शिकवलेल्या शिकवणुकीमुळे अन्य धर्मियांनी देखील त्याकाळी लिंगायत धर्माचा स्वीकार केला होता. जैन ,शीख धर्मियांप्रमाणे लिंगायतांना देखील घटनात्मक हक्क मिळाले पाहिजेत”, अशी मागणी लिंगायत अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष आणि निवृत्त आयएएस अधिकारी ए. एस. जामदार यांनी केली.



नागनूर रुद्राक्ष मठाचे सिद्धराम स्वामीजी यांनी लिंगायत समाजाच्या मागण्यांचे निवेदन वाचून दाखवले. यावेळी उपस्थित मठाधीशांनी जोरदार घोषणाबाजी करून उपस्थितात चैतन्य निर्माण केले.

महारॅली शहरातील प्रमुख रस्त्यावरून फिरून राणी कित्तूर चन्नमा चौकात आली. तेथे लिंगायत समाजाच्या मठाधीशांनी लिंगायत समाजाच्या मागणीचे निवेदन प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

महारॅलीच्यावेळी शहरातील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली होती. बाहेरगावाहून आलेल्या वाहनांसाठी ठिकठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती. अनेक ठिकाणी भोजनाची, पिण्याच्या पाण्याची सोयही करण्यात आली होती. पोलीस उपायुक्त सीमा लाटकर या स्वतः महारॅलीच्यावेळी पोलीस फौजफाट्यासह लक्ष ठेवून होत्या. सरदार हायस्कूलचे मैदान देखील बाहेरून आलेल्या वाहनांनी भरून गेले होते.

निपाणी, कोल्हापूर, हुबळी, धारवाड, सांगली, कोल्हापूर, चिकोडी, विजापूर इत्यादी भागातून लिंगायत समाजाच्या व्यक्ती महारॅलीत सहभागी झाल्या होत्या.