नवरीला पाहून मूड ऑफ, नवरदेवाने मंडपातच फटकावलं
एबीपी माझा वेब टीम | 15 Jun 2017 04:40 PM (IST)
फोटो सौजन्य : पंजाब केसरी (यूपी)
जौनपूर : लग्नघटिका समीप आली, नवरदेव-नवरी समोरासमोर आले. आता दोघं एकमेकांच्या गळ्यात हार घालणार इतक्यात नवरदेवाने वधूच्या सणसणीत कानाखाली लगावली. घडलेल्या प्रकारामुळे वधूसह उपस्थित अवाक झाले, मात्र नवरदेवाने तिला कानशिलात लगावण्याचं कारण समजताच लग्नाचा नूरच पालटला. उत्तर प्रदेशातील जौनपूरमधल्या मडियाहू गावात ही आश्चर्यकारक घटना घडल्याची माहिती आहे. सुर्यबली यादव यांच्या कन्येचं लग्न धर्मवीर नावाच्या तरुणाशी ठरलं होतं. वऱ्हाडी लग्नाचा आनंद लुटत असताना स्टेजवर वरमाला घालण्याची तयारी सुरु होती. इतक्यात नवरदेवाने भर मंडपातच नवरीला सणसणीत लगावली. वराचं आक्षेपार्ह वर्तन पाहून वधूपक्षातील मंडळी तातडीने स्टेजवर धावली आणि त्यांनी वधूची सुटका केली. मात्र दोन्ही पक्षाच्या मंडळींमध्ये हाणामारीला सुरुवात झाली. त्याचवेळी नवरदेव मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचं आणि भांगाची नशा करत असल्याचं समजलं. वधूपक्षाने नवरदेवाला धू-धू धुतलं. इतकं की, त्याचे कपडेही फाटले. अखेर त्याने वधूला मारायला सुरुवात का केली, याचं कारण विचारलं, तेव्हा सगळेच थक्क झाले. 'मला वेगळ्याच तरुणीचा फोटो दाखवलेला होता. स्टेजवर असलेली मुलगी अत्यंत काळी आहे. तिचं वजनही खूप कमी आहे. तिला पाहून माझा मूड ऑफ झाला आणि मी तिला कानशिलात लगावली.' असं कारण धर्मवीरने पुढे केलं. त्यामुळे उपस्थितांना हसावं की रडावं, हेच कळेनासं झालं.