अयोध्या : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज अयोध्येतील रामलला आणि हनुमानगढी मंदिरांचं दर्शन घेतलं. पूजेनंतर योगी आदित्यनाथ यांनी अयोध्या मंदिराबाबत मोठं वक्तव्य केलं. अयोध्येत राम मंदिर होतं, मंदिर आहे आणि मंदिर राहणार यात शंका नाही, असं आदित्यनाथ म्हणाले.
"अयोध्या मंदिराबाबत संविधानाच्या चौकटीत राहून सरकार काम करणार आहे. अयोध्येत मंदिर होतं आणि मंदिरच राहणार", हे सांगायलाही योगी यावेळी विसरले नाहीत.
अयोध्येतील सरयु तटावर 151 फूट रामाच्या मूर्तीच्या निर्मितीबाबत आदित्यनाथ म्हणाले की, " भगवान रामाच्या दर्शनीय मूर्तीसाठी दोन जागांची पाहणी करण्यात आली आहे. रामाची अशी मूर्ती तयार करायची आहे, जी अयोध्येची ओळख बनेल."
कालच योगी आदित्यनाथ यांनी फैजाबाद जिल्ह्याचे नाव बदलून अयोध्या केलं. अयोध्येतील दीपोत्सव कार्यक्रमादरम्यान फैजाबादच्या नामांतरासोबत आणखी काही महत्वाच्या घोषणा योगींनी केल्या.
अयोध्येतील मेडिकल कॉलेजचे नाव राजर्षी दशरथ ठेवलं, तर भगवान श्रीराम यांचं नाव विमानतळाला देण्याची घोषणाही योगी आदित्यनाथ यांनी केली. यापूर्वीच योगी आदित्यनाथांनी अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज केले आहे.