लखनौ : उत्तर प्रदेशच्या मेरठमधील एका शाळेच्या व्यवस्थापनाने विद्यार्थांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासारखे केस कापण्याचं फर्मान सोडलं आहे. परंतु शाळेच्या या आदेशाचा अनेक पालकांनी तीव्र विरोध केला आहे.

मोठे केस आणि दाढी असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश करण्यास शाळेच्या व्यवस्थापनाने मज्जाव केला. इतकंच नाही तर डब्ब्यात मांसाहार आढळल्यास त्याला शाळेबाहेर काढलं जाईल, असे निर्देशही देण्यात आले आहेत. शाळा धर्माच्या आधारावर भेदभाव करत असल्याचा आरोप केला जात आहे.

ऋषभ अकॅडमीच्या व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना 'योगी कट' करण्याचं फर्मान सोडलं आहे. परंतु अनेक पालकांनी या आदेशाला विरोध केला आहे. याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि प्रकरण सोडवत विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळवून दिला.

वेस्ट एंड रोडवर असलेल्या ऋषभ अकॅडमीमध्ये गुरुवारी नेहमीप्रमाणे पालक आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी आले होते. पण एक विशेष धर्माच्या पालकाने आरोप करत गोंधळ घातला की, शाळेचे सचिव रणजीत जैन आपल्या मुलांना केसांचा 'योगी कट' करण्यासाठी दबाव टाकत आहेत.

पालकांचं म्हणणं होतं की, ज्या मुलांनी 'योगी कट' केला नाही आणि दाढी वाढलेली आहे, त्यांना शाळेत प्रवेश दिला जात नव्हता. शिवाय मुलांनी 'योगी कट' करावा यासाठी वर्गात कोणत्याही कारणाने छळ केला जात आहे." "जर विद्यार्थ्यांचे केस छोटे करायचेच होते, तर त्यांना केसांचा फौजी कट करण्यासाठीही सांगितलं जाऊ शकलं असतं," असं मतही पालकांनी व्यक्त केलं.

दरम्यान, शाळेचे सचिव रणजीत जैन यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. "मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे केस छोटे आहेत, त्यामुळे विद्यार्थीही त्यांच्यासारखे केस कापू शकतात. मी विद्यार्थ्यांना केवळ केस छोटे करण्यासाठी आणि दाढी करण्यासाठी सांगितलं होतं," असं रणजीत जैन म्हणाले.

"या निर्णयामागे विद्यार्थ्यांना शिस्तबद्द पद्धतीने शिक्षण देण्याचा उद्देश होता," असं सचिवांनी सांगितलं. शिवाय शाळेत आधीपासूनच मांसाहारी पदार्थ आणण्यास मनाई आहे. यासाठी या प्रकरणाला धार्मिक रंग देणं चुकीचं असल्याचं जैन म्हणाले.