अखिलेश यादव यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे खासदार रामगोपाल यादव यांची मुलायमसिंह यादव यांनी थेट पक्षातून हकालपट्टी केली. सहा वर्षांसाठी रामगोपाल यादव यांना समाजवादी पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे.
मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सकाळी आपले काका आणि राजकीय वैरी शिवपाल यादव यांच्यासह अन्य तीन मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली. भाजप नेत्यांशी संगनमत करुन रामगोपाल यादव हे पक्षाविरोधात कट कारस्थान करत असल्याचा आरोप प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव यांनी पत्रकार परिषदेत केला.
अखिलेश यादव यांनी शिवपाल यादव यांच्यासोबत ओमप्रकाश सिंह, नारद राय आणि शादाब फातिमा यांनाही मंत्रीमंडळातून बडतर्फ केलं आहे. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांना चार मंत्र्यांच्या बडतर्फीचं पत्र पाठवलं.
समाजवादी पक्षाला कौटुंबिक कलहानं ग्रासलं आहे. मुलायम सिंह आणि त्यांचे बंधू शिवपाल सिंह हे एका गटात आहेत. तर अखिलेश यादव, खासदार रामगोपाल यादव हे दुसऱ्या गटात आहेत. या वादाची ठिणगी अमरसिंह यांच्यामुळे पडल्याचे बोललं जात आहे.