लखनऊ : उत्तर प्रदेशच्या समाजवादी पक्षातील वाद आता उघडपणे समोर आला आहे. आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आपल्या अधिकारांचा वापर करत शिवपाल यादवसहित चार मंत्रांना मंत्रीमंडळातून काढून टाकलं आहे.
अखिलेश यादव यांनी शिवपाल यादव यांच्यासोबत ओमप्रकाश सिंह, नारद राय आणि शादाब फातिमा यांनाही मंत्रीमंडळातून बडतर्फ केलं आहे. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांना चार मंत्र्यांच्या बडतर्फीचं पत्र पाठवलं आहे.
या वादाच्या पार्श्वभूमीवर अखिलेश यादव यांनी आज कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी जवळपास 415 नेत्यांना बोलावण्यात आलं. या बैठकीसाठी शिवपाल यादव समर्थक 20 ते 25 नेत्यांना वगळता सर्व नेत्यांना बोलावण्यात आलं होतं.
उदयवीर सिंहांनाही बाहेरचा रस्ता
अखिलेश यादव यांच्या समर्थनार्थ मुलायम यादव यांना पत्र लिहिणाऱ्या उदयवीर सिंह यांनाही पक्षाने बाहेरचा रस्ता दाखवला आहे.