गोवा : पणजी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रदेश भाजप तर्फे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर आणि पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांची नावे केंद्रीय समितीकडे पाठवण्यात आली आहेत. आज सायंकाळी पणजीच्या उमेदवाराची घोषणा केली जाणार आहे.


पणजीचा  उमेदवार ठरवण्यासाठी भाजपकडून काल दिवसभर चाचपणी करण्यात आली. सकाळी पणजी मनपाच्या नगरसेवकांची मते जाणून घेतल्यानंतर पणजी भाजप मंडळातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन सगळ्यांची मते जाणून घेण्यात आली.


प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर, सरचिटणीस सदानंद तानावडे, संघटन मंत्री सतीश धोंड, वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी सर्वांची मते जाणून घेतली.


कार्यकर्त्यांची मते जाणून घेतल्यानंतर रात्री उशिरा भाजपच्या राज्य निवडणूक समिती बैठक पार पडली. या बैठकीत पणजीचे नगरसेवक, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी सूचवलेल्या नावांवर चर्चा करून उत्पल पर्रिकर आणि सिद्धार्थ कुंकळ्येकर यांची नावे निश्चित करण्यात आली.


सिद्धार्थ आणि उत्पल यांची नावे आज दिल्ली येथील केंद्रीय समितीला कळवण्यात आली आहेत. आज सायंकाळपर्यंत पणजीचा उमेदवार जाहीर होऊ शकेल, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर यांनी दिली आहे.