वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून उद्या उमेदवारी अर्ज भरण्याआधी आज मोठं शक्तिप्रदर्शन करणार आहेत. त्यासाटी आज दुपारी मोदींचा सात किलोमीटर लांब असा रोड शो आयोजित करण्यात आला आहे. मदनमोहन मालवियांच्या पुतळ्याला अभिवादन करुन मोदी रोडशोची सुरुवात करणार आहेत.  त्यानंतर संध्याकाळी 6 च्या सुमारास मोदी गंगेकाठी आरती करतील.


पंतप्रधान मोदींची हा रोड शो बीएचयूपासून दशाश्वमेघ घाटापर्यंत असेल. मागील विधानसभानिवडणुकांच्या वेळीही मोदींनी याच ठिकाणापासून रोड शो सुरू केला होता. या रोड शो दरम्यान मोदींच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. वाराणसीत राहणारे वेगवेगळ्या राज्यातील लोक पारंपरिक पद्धतीने मोदींचे स्वागत करणार आहेत.

रोड शो दरम्यान गुलाबांच्या फुलांचा वर्षाव

नरेंद्र मोदी यांचा हा रोड शो अस्सी मोड, मुमुक्षु भवन, आनंदमयी हॉस्पिटल, शिवाला तिराहा, सोनारपुरा, जगमबाडीमधून गोदौलिया पोहोचेल. या रोड शो साठी रस्त्याच्या दुतर्फा बॅरिकेट्स लावले गेले आहेत. शहरात मोदींच्या स्वागताचे फलक जागोजागी लावले गेले आहेत. या रोड  शो दरम्यान गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला जाणार आहे.

या सात किलोमीटरचा रोड शो काशी विश्वनाथ मंदिराच्या द्वाराजवळ संपेल. या रोड शोसाठी पाच लाख लोकांना बोलावण्याची तयारी केली आहे. वाराणसी शेजारील जिल्ह्यातील लोकांनाही या रोड शो साठी बोलावले आहे. या रॅलीसाठी भाजपच्या बड्या नेत्यांनी गेल्या काही दिवसांपासून वाराणसीत ठाण मांडले आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शाह स्वतः वाराणसीत ठाण मांडून आहेत.

या शो साठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह त्यांचे मंत्रिमंडळ, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार उपस्थित असणार आहेत. या रोड शो साठी मोदी दुपारी 2.30 वाजता बाबतपूर एयरपोर्टला पोहोचतील. तिथून हेलिकॉप्टरने ते बीएचयूच्या हेलिपॅडवर उतरतील. दुपारी 3 वाजता मदन मोहन मालवीय यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून रोड शो सुरु होईल.