रेल्वे रुळाचं काम सुरु असूनही रेल्वे त्याच मार्गावरुन पुढे नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामुळे पुरी-हरिद्नार एक्स्प्रेस रुळावरुन घसरली. अपघात इतका भीषण आहे, की एक्स्प्रेसचे 2 डबे एकमेकांवर चढले, तर काही डबे रुळाशेजारील घरात घुसले.
दरम्यान संध्याकाळनंतर बचावकार्य थांबवण्यात आलं आहे. जखमींवर मुजफ्फरनगर, मेरठ आणि हरिद्वार येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे सहा पुरावे
एबीपी न्यूजने घटनास्थळी जाऊन घटनेची पडताळणी केली. यामध्ये काही धक्कादायक बाबी आढळून आल्या. या पडताळणीत अशा काही गोष्टी आढळून आल्या, ज्यामुळे या दुर्घटनेला रेल्वेचा निष्काळजीपणाच कारणीभूत असल्याचं सिद्ध होतं.
पुरावा 1 : एबीपी न्यूजचे प्रतिनिधी घटनास्थळी गेले तेव्हा तिथे त्यांना हातोडा आढळून आला, जो रेल्वे कर्मचाऱ्यांचाच असण्याची दाट शक्यता आहे. शिवाय तांत्रिक काम करतानाचं रेल्वेचं साहित्यही ट्रॅकशेजारीच पडून होतं.
पुरावा 2 : अपघात झाला त्या ठिकाणी ट्रेनचं इमर्जन्सी ब्रेक लावल्याचंही आढळून आलं.
पुरावा 3 : ज्या रेल्वे रुळावर ही घटना घडली तिथे ट्रॅकचा तुकडा कापलेल्या अवस्थेत आढळून आला. सोबतच दोन रुळांना जोडणारी फिश प्लेटही मिळाली. ज्यामुळे रेल्वे रुळावर दुरुस्तीचं काम सुरु असल्याचं सिद्ध होतं.
पुरावा 4 : घटनास्थळापासून काही अंतरावर लाल झेंडा आढळून आला. दुरुस्तीचं काम सुरु असल्यानंतर हा लाल झेंडा वापरला जातो.
पुरावा 5 : रेल्वे रुळाचं काम चालू असताना ट्रेन तिथून गेली, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. विशेष म्हणजे अपघातावेळी घटनास्थळी काही रेल्वेचे कर्मचारी असल्याचंही काहींचं म्हणणं आहे.
पुरावा 6 : रेल्वे रुळावर दुरुस्तीचं काम चालू होतं आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी निष्काळजीपणा दाखवला, अशी माहिती उत्तर प्रदेशचे मुख्य गृह सचिव अरविंद कुमार यांनी दिली.