भारतात हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांवर पाकिस्तानकडून कारवाई नाहीच : अमेरिकेचा अहवाल
एबीपी माझा वेबटीम | 06 Nov 2019 10:35 AM (IST)
अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाने दहशतवादासंदर्भात एक रिपोर्ट जारी केला आहे. या रिपोर्टनुसार दहशतवाद्यांना पाठिशी घालणाऱ्या पाकिस्तानची पुन्हा एकदा पोलखोल झाली आहे.
न्यू यॉर्क : दहशतवाद्यांना पाठिशी घालणाऱ्या पाकिस्तानची पुन्हा एकदा पोलखोल झाली आहे. दहशतवादासंदर्भात अमेरिकेने सादर केलेल्या रिपोर्टनुसार पाकिस्तानने भारतात हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांविरोधात कोणतीही कारवाई केलेली नाही. भारताने जागतिक स्तरावरील अनेक व्यासपीठांवर दावा केला आहे की, पाकिस्तानमध्ये अनेक दहशतवादी संघटनांचे तळ आहेत. पाकिस्तान त्यांना पाठिशी घालत आहे. हेच दहशतवादी सातत्याने भारताला लक्ष्य करत आहेत. भारताचा हा दावा आता पुन्हा एकदा खरा ठरला आहे. अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाने दहशतवादासंदर्भात एक रिपोर्ट जारी केला आहे. त्यामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, पाकिस्तानमध्ये ज्या दहशतवादी संघटनांनी हल्ले केले, केवळ त्यांच्यावरच पाकिस्तानने कारवाई केली आहे. परंतु ज्या दहशतवादी संघटनांनी भारतात आतंकवादी कारवाया केल्या, हल्ले केले त्यांच्यावर मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. अमेरिकेच्या या रिपोर्टनुसार पाकिस्तामध्ये अनेक दहशतवादी संघटनांचे तळ आहेत. ही बाब पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. तसेच पाकिस्तानातील हे दहशतवादी भारतात कारवाया करत असल्याचा भारताचा दावादेखील त्यामुळे खरा ठरतो.