नवी दिल्ली : राजधानीत खाकी विरुद्ध काळे कोट असा वाद उफाळून आला आहे. दिल्ली पोलीस आणि काही वकिलांमध्ये पार्किंगच्या कारणावरुन वाद झाला होता. यावरुन तीस हजारी कोर्टात वकील आणि पोलिस यांच्यात हाणामारी झाली. याच पार्श्वभूमीवर आज शेकडो पोलिसांनी दिल्ली पोलिस मुख्यालयासमोर निदर्शने केली. आम्हाला मानवाधिकार नाही का? असा प्रश्न यावेळी पोलीसांनी उपस्थित केला. यावेळी 'हाउ इज द जोश- लो सर' अशा आशयाचे पोस्टर्सही दाखवले जात आहे.


"गेल्या काही दिवस दिल्ली पोलीसांसाठी कठीण काळ आहे, आमच्यासाठी हे आव्हान काही नवीन नाही. आम्ही वेगवेगळ्या आव्हानांशी नेहमी सामना करतो. गेल्या काही दिवसांत अशा काही घटना घडल्यात, मात्र आम्ही त्या चांगल्या प्रकारे हाताळल्या. दरम्यान, परिस्थितीत सुधारणा होत असून लवकरच पूर्वपदावर येईल", अशी माहिती पोलिस आयुक्त अमूल्य पटनायक यांनी दिली.

Delhi Police Protest Live -

  • दिल्लीत निदर्शन करणाऱ्या पोलीसांना बिहार पोलिस असोसिएशनचा पाठिंबा मिळाला आहे. "आम्ही दिल्ली पोलीसांच्या सोबत उभे आहोत, ज्यांच्यावर हल्ला झाला. आम्ही या प्रकरणाच्या तपासाची मागणी केली आहे. पोलिस आणि वकील दोघांनाही कायदा माहिती आहे. त्यामुळे कोणीही कायदा हातात घ्यायला नको होता". असे बिहार पोलिस असोसिएशनने म्हटले आहे.

  • दिल्ली पोलिस कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांचे इंडिया गेट वर प्रदर्शन. तीस हजारी कोर्ट परिसरात पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचा योग्य तपास करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.

  • वकील आणि पोलिस संघर्षावरुन वकिलांच्या विरोधात दंडात्मक कारवाई न करण्याचा हायकोर्टाचा आदेश नंतरच्या घटनांवर लागू होणार नाही. दिल्ली हायकोर्टाने केंद्राच्या याचिकेवरुन बीसीआय आणि अन्य बार संघटनांना नोटिस जारी केले आहे.

  • दिल्ली पोलिस मुख्यालयाच्या बाहेर पोलिस कर्मचाऱ्यांचे प्रदर्शन. जॉईंट सीपी राजेश खुराना यांच्यासमोर पोलिसांची घोषणाबाजी. 'गो बॅक' आणि 'मुद्द्यावर बोला' अश्या घोषणा त्यांनी दिल्या. जॉईंट सीपी निदर्शनकर्त्यांना मनवण्यासाठी पोहचले.

  •  दिल्ली पोलिस आणि वकिलांच्या संघर्षावरुन काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांनी आपली प्रतिक्रिया दिली. साडेपाच वर्षांत जे वातवरण तयार झालंय त्याचे हे एक उदाहरण आहे. समाजातील प्रत्येक वर्गात राग आहे.

  • सोमवारी साकेत कोर्टात घडलेल्या घटनेसंदर्भात पोलिसांनी 2 एफआयआर नोंदवल्या आहेत. एक एफआयआर दिल्ली पोलिस ऑफिसरच्या तक्रारीवरुन नोंदवली. तर, दुसरी एफआयआर टॅक्सी ड्रायवरच्या तक्रारीवरुन नोंदवली आहे. ज्याच्यावर स्टील रॉडने हल्ला केला होता. दोन्ही एफआयआर साकेत ठाण्यात नोंदवण्यात आल्या आहेत.


पोलिस आयुक्तांचे आवाहन

''नागरिक आणि सरकाच्या आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत. आपण नियमात राहून कायदा आणि सुव्यवस्था सांभाळली पाहिजे. आपल्यासाठी हा परिक्षेचा काळ आहे. हायकोर्टाने याप्रकरणी एक समिती स्थापन केली आहे. तपासानंतर योग्य कारवाई केली जाईल, अशी आशा बाळगूया", असे आवाहन पोलिस आयुक्तांनी निदर्शनकर्त्या कर्मचाऱ्यांना केले आहे.

काय आहे प्रकरण?
उत्तर दिल्लीतील तीस हजारी कोर्ट परिसरात शनिवारी दुपारी आरोपींना जेव्हा सुनावणीसाठी आणलं जातं ती लॉक अप व्हॅन कोर्टासमोर उभी होती. त्यावेळी एका वकिलाने या व्हॅनसमोर कार पार्क केली. त्यावरुन राडा सुरु झाला. पोलिसांनी राड्यादरम्यान गोळीबार केला आणि त्यात एका वकिलाचा मृत्यू झाला अशीही अफवा पसरली. या अफवेनंतर संतापलेल्या वकिलांनी पोलिसांवर हल्ला चढवला. ज्यानंतर तीस हजारी कोर्ट परिसरात एकच हंगामा झाला. या सगळ्या राड्यामध्ये २८ जण जखमी झाले. पोलीस आणि वकील भिडल्याने अनेक कर्मचारी आणि कैदी कोर्टात अडकले होते.