कोलकाता : भारतीय जनता पक्षाचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी एक वादग्रस्त वक्तव्य करुन पश्चिम बंगालमध्ये गोंधळ निर्माण केला आहे. दिलीप घोष यांनी रस्त्यांवर गोमांस खाणाऱ्यांना कुत्र्याचे मांस खाण्याचा सल्ला दिला आहे.


घोष म्हणाले की, काही लोक रस्त्यांवर किंवा कुठेही बसून मांस खातात, मी त्यांना सांगू इच्छितो की आता त्यांनी कुत्र्याचे मांसदेखील खायला हवे. त्यामुळे त्यांचे आरोग्य सुदृढ होईल. ज्यांना गोमांस खायचे आहे, त्यांनी ते त्यांच्या घरी बसून खायला हवे, रस्त्यावर का? बर्दवान येथे एका जाहीर सभेत ते बोलत होते.

दरम्यान, दिलीप घोष यांनी यावेळी गायीच्या दुधाबद्दल एक अजब तर्क लढवल्यामुळे ते सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागले आहेत. गायीच्या दुधात सोन्याचा अंश असल्यामुळे गायीच्या दुधाचा रंग पिवळसर असतो, असा त्यांचा दावा आहे.

घोष म्हणाले की, देशी गायींच्या पाठीवर वशिंड असते. या वशिंडावर सूर्यप्रकाश पडतो तेव्हा त्यातून सोनं निर्माण होतं. त्यामुळेच देशी गायीचे दूध पिवळसर किंवा साधारण सोन्याच्या रंगाचे असते. कोणतीही व्यक्ती फक्त गायीचे दूध पिऊन नीट जगू शकते. त्याची अनेक उदाहरणे आपल्याकडे आहेत.