नवी दिल्ली : अमेरिकेच्या सुरक्षा सल्लागार सुझान राइस यांनी भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना फोन करुन उरी हल्ल्याचा निषेध केला. यावेळी सुझान राइस म्हणाल्या की, "संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या संघटनांचा नायनाट करण्यासाठी पाकिस्तान ठोस कारवाई करेल, अशी व्हाईट हाऊसची पाकिस्तानकडून अपेक्षा आहे."
उरी हल्ल्यानंतर सुझान राइस यांनी अजित डोभाल यांच्यासोबत फोनवरुन पहिल्यांदाच बातचीत केली. 18 सप्टेंबर रोजी भारतीय सैन्यावर सीमेवरुन झालेल्या हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध केला. तसंच शहीद जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांचं सांत्वनही केलं.
काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये भारतीय सैन्याच्या कॅम्पवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 18 जवान शहीद झाले होते. यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे.
राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते नेड प्राइस म्हणाले की, "पाकिस्तानने लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मदसह संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या संघटना, व्यक्ती आणि त्याच्या संबंधित गटाचा सामना किंवा नायनाट करण्यासाठी ठोक कारवाई करावी, असा पुनरुच्चार सुझान राइस यांनी अजित डोभाल यांच्यासोबत झालेल्या संभाषणात केला."
"राइस यांनी या परिस्थितीत भारताच्या संयमाची आणि कुटनिती प्रयत्नांची स्तुती केली. तसंच भारत भविष्यातही हे प्रयत्न कायम ठेवेल," असा विश्वास व्यक्त केल्याचंही नेड प्राईस यांनी सांगितलं.