जपानमधील जी-20 शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट होणार आहे. या भेटीपूर्वी ट्रम्प यांनी ट्विट करत भारतात अमेरिकी वस्तूंवर लादण्यात येणाऱ्या आयातकराबाबत प्रश्न केला आहे. भारताकडून लावण्यात येणारे आयातकर मान्य नसल्याचं त्यांनी म्हटले आहे.

अमेरिकेतून भारतात आयात केल्या जाणाऱ्या काही वस्तूंवर मोठ्या प्रमाणावर आयातकर लावण्यात येतो. भारतात आयात होणाऱ्या 28 अमेरिकी वस्तूंवरील आयातकर वाढवण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेण्यात आला होता. त्याबाबत ट्रम्प यांनी ट्विटरवर आपली भूमिका मांडली आहे."मी मोदींसोबत भेटीसाठी उत्सुक आहे. पण त्यांनी अमेरिकी उत्पादनांवर जे कर लावले आहेत ते मान्य करण्यासारखे नाहीत. गेल्या काही दिवसात ते आणखी वाढलेत. ते तातडीनं कमी व्हावेत", असे ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे.


जपान मध्ये होत असलेल्या जी-20 शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. यावेळी त्यांची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी भेट होणार आहे. 28-29 जून दरम्यान जपानमधील ओसाका येथे ही परिषद पार पडणार आहे.