गया (बिहार): वडील शहीद झाल्यानंतरही त्याच्या तीन मुलींनी शाळेत जाऊन मोठ्या धैर्यानं परीक्षा दिली.  बिहारच्या गयामध्ये ही हृदयद्रावक चित्र पाहायला मिळालं.


उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बिहारचे सुनील कुमार शहीद झाले. त्यांच्या निधनाचं वृत्त त्यांच्या गावी पोहोचलं. मात्र, त्यांच्या तिन्ही मुलींची परीक्षा होती. त्यामुळे वडिलांच्या निधनाची बातमी कळल्यानंतरही तिन्ही मुलींनी शाळेत जाऊन परीक्षा दिली.

सुनील कुमार यांची मोठी मुलगी आरती कुमारी आठवीत, दुसरी मुलगी अंशु कुमारी सहावीत तर छोटी मुलगी अंशिका कुमारी दुसरीत शिकते. वडिलांच्या निधनानंतरही परीक्षा देणाऱ्या या सावित्रींच्या लेकींचं देशभरातून कौतुक होतं आहे.



'पप्पांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे'

या मुलींचं म्हणणं आहे की, आम्हाला पप्पांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. जेव्हा पप्पांशी शेवटचं बोलणं झालं त्यावेळी त्यांनी आम्हाला परीक्षेबद्दल विचारलं होतं आणि नीट अभ्यास करा असंही सांगितलं होतं. सुनील कुमार यांची सगळ्यात छोटी मुलगी आणि दुसरीत शिकणाऱ्या अंशिकाला आता आठवत देखील नाही की तिचं पप्पांशी शेवटचं बोलणं कधी झालं होतं.

18 वर्षापूर्वी 1998 साली सुनील कुमार देशसेवा करण्यासाठी लष्करात भरती झाले होते. 18 सप्टेंबर रोजी दहशतवाद्यांशी लढताना त्यांना वीरमरण आलं.