चेन्नई : मद्रास हायकोर्टाच्या न्यायमूर्ती विजया के ताहिलरमानी यांनी बदलीच्याविरोधात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. त्यांनी आपल्या राजीनाम्याची एक प्रत सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनाही पाठवली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कोलॅजियमने मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती विजया ताहिलरमानी यांची बदली मेघालय उच्च न्यायालयात केली होती.
 
काय आहे प्रकरण?
28 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील कोलॅजियमने मेघालय हायकोर्टाचे न्यायमूर्ती एके मित्तल यांची मद्रास हायकोर्टात बदली केली होती. तर न्यायमूर्ती ताहिलरमानी यांची बदली मेघालय हायकोर्टात केली. सुप्रीम कोर्टाच्या कोलॅजियममध्ये न्यायमूर्ती एसए बोबडे, एनवी रमणा, अरुण मिश्रा आणि आरएफ नरीमन यांचा समावेश आहे.

मेघालय हायकोर्टात चार न्यायाधीश आहेत. तर मद्रास हायकोर्टात 75 न्यायाधीश आहे. आपल्याला तातडीने कार्यमुक्त करावं, अशी विनंती न्यायमूर्ती ताहिलरमानी यांनी राजीनाम्यात राष्ट्रपतींना केली. पुढील कारवाईसाठी राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा सरकारकडे पाठवला आहे.

न्यायमूर्ती ताहिलरमानी यांची 26 जून 2001 रोजी वयाच्या अवघ्या 43 व्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यानंतर 12 ऑगस्ट 2008 त्यांची मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती म्हणून नेमणूक करण्यात आली. देशातील 25 उच्च न्यायालयांमध्ये न्यायमूर्ती विजया ताहिलरमानी आणि गीता मित्तल या दोघीच महिला न्यायमूर्ती आहेत. न्यायमूर्ती ताहिलरमानी 2 ऑक्टोबर 2020 रोजी निवृत्त होणार आहेत. मात्र त्यांनी निवृत्तीच्या सुमारे एक वर्षाआधीच राजीनामा दिला आहे.