बंगळुरु : 'चांद्रयान 2' मोहीमेत आलेल्या अडचणीमुळे इस्रोचे प्रमुख के सिवन अतिशय भावुक झाले. इस्रोच्या कंट्रोल रुममधील संबोधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी बाहेर आले आणि भावुक झालेले इस्रो प्रमुख रडू लागले. मोदींनी गळाभेट घेतल्यानंतर के सिवन यांनी अश्रूंना मोकळी वाट करुन दिली. यावेळी मोदींनीही भारतीय तुमच्या पाठीशी आहेत, असं म्हणत के सिवन यांना धीर दिला.



इस्रो प्रमुख रडले, पंतप्रधानही भावुक 
पंतप्रधान मोदींना त्यांच्या गाडीपर्यंत सोडण्यासाठी गेलेल्या इस्रो प्रमुखांना आपलं दु:ख लपवणं कठीण झालं आणि ते रडू लागले. यानंतर पंतप्रधानांनी त्यांची गळभेट घेऊन पाठ थोपटली आणि धीर दिला. पंतप्रधान गाडीत बसले आणि के सिवन यांनी त्यांना निरोप दिला.  परंतु सिवन यांचे डबडबलेले डोळे आणि चेहऱ्यावरील निराशा स्पष्ट दिसत होती. तर पंतप्रधानांच्या चेहऱ्यावरही काहीसे निराशेचे भाव होते.

कोण आहेत के सिवन?

  • इस्रो प्रमुख के सिवन यांचं पूर्ण नाव कैलासवादिनू सिवन हे आहे.

  • 62 वर्षीय के सिवन यांचा जन्म तामिळनाडूतील सरकल्लविलाई गावात झाला

  • शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सिवन यांचं शिक्षण सरकारी शाळेत तामिळ भाषेत झालं

  • पदवीपर्यंतचं शिक्षण घेणारे के सिवन हे कुटुंबातील पहिले सदस्य होते.

  • मद्रास आयआयटीमधून त्यांनी इंजिनीअरिंग पूर्ण केलं

  • यानंतर बंगळुरुच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून त्यांनी एअरोस्पेस इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलं

  • के सिवन 1982मध्ये इस्रोमध्ये दाखल झाले, यानंतर 2006 मध्ये आयआयटी मुंबईमधून पीएचडी केली

  • स्वदेशी क्रायोजेनिक इंजिन बनवण्यात सिवन यांचा मोलाचा वाटा आहे

  • रॉकेटमॅन म्हणूनही के सिवन यांना ओळखलं जातं.

  • 2017 मध्ये 104 उपग्रह एकाचवेळी अवकाशात सोडण्याचा विक्रम त्यांनी केला होता

  • 2018 मध्ये इस्रोचे प्रमुख होण्याआधी ते विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे संचालक होते


लॅण्डर विक्रमशी संपर्क तुटला

अवघ्या जगाचं लक्ष लागलेली भारताची महत्वाकांक्षी चंद्रयान मोहीम चंद्राच्या 2.1 किलोमीटर जवळ जाऊन थांबली. चंद्राच्या 2.1 किलोमीटर अंतराजवळ गेल्यावर विक्रम लॅण्डरशी संपर्क तुटला. पण अजूनही संपर्क होण्याची आशा कायम आहे. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांकडून डेटा विश्लेषणाचं काम सुरु आहे.

दरम्यान अद्याप भारताची ही मोहीम अयशस्वी ठरलेली नाही. लॅण्डरशी जरी संपर्क तुटला असला तरी ऑर्बिटरद्वारे मोहीमेचा बराचसा भाग पूर्ण करता येणार आहे. सध्या काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत, त्या सोडवण्याचा प्रयत्न सुरु आहे.

पंतप्रधानांकडून वैज्ञानिकांना धीर

"मी तुमची मनस्थिती जाणतो, पण निराश होऊ नका, देश इस्रोच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. संपूर्ण देशाला तुमचा अभिमान आहे," अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांद्रयान 2 मोहीमेशी संबंधित प्रत्येकाला धीर दिला. "मी इथे तुम्हा उपदेश देण्यासाठी आलेलो नाही. तर सकाळी सकाळी तुमचं दर्शनाने प्रेरणा घेण्यासाठी आलोय. तुम्ही स्वत: प्रेरणेचा समुद्र आहात," असं मोदी म्हणाले.

संबंधित बातम्या

Chandrayaan-2 | विक्रम लँडरशी संपर्क होण्याची आशा कायम, इसरोच्या शास्त्रज्ञांचं डेटा विश्लेषणाचं काम सुरु

Chandrayaan 2 : विक्रम लॅण्डरशी संपर्क तुटला, मोदी इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या पाठीशी