UPSC vs IIT JEE which is the toughest exam? : सोशल मीडियावर सध्या नवीन चर्चेला उधाण आलं आहे आणि ते म्हणजे, जगातील सर्वात कठीण परीक्षा नेमकी कोणती? IIT JEE की UPSC? तसं पाहिलं तर, IIT JEE आणि UPSC या दोन परीक्षा देशातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठीत परीक्षांमध्ये गणल्या जातात. जागतिक दृष्टीकोनातूनही या दोन परीक्षा कठीण मानल्या जातात.
पण अलीकडेच, महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी ट्विटरवर केलेल्या ट्विटनंतर 'UPSC Vs IIT JEE' असा वाद सुरू झाला. सोशल मीडियावर त्यांनी एक पोस्ट केली, ज्यावर अनेक लोक दोन्ही परीक्षांबाबत त्यांचे अनुभव, त्यांची मतं आणि प्रतिक्रिया शेअर करत आहेत. आनंद महिंद्रांनी असं नेमकं म्हटलं तरी काय ज्यावरुन या दोन परीक्षांबद्दल चर्चा सुरू झाली? पाहूया.
UPSC Vs IIT JEE वर चर्चा कशामुळे?
'द वर्ल्ड रँकिंग'ने ऑक्टोबरमध्ये जगातील 10 सर्वात कठीण परीक्षांची यादी जाहीर केली. या कठीण परीक्षांच्या यादीत, IIT JEE दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षा तिसऱ्या क्रमांकावर आहे. आता या यादीवर आनंद महिंद्रा यांनी प्रतिक्रिया दिली आहे, त्यांनी ट्विटरवर या परीक्षांबद्दलचं आपलं मत मांडलं.
आनंद महिंद्रा नेमके म्हणाले तरी काय?
महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी जागतिक क्रमवारीत बदल करण्याचा सल्ला दिला. आयपीएस अधिकारी मनोज शर्मा यांच्या संघर्षावर बनलेला '12वी फेल' चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली. हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी 'जगातील सर्वाच कठीण परीक्षां'ची रँकिंग शेअर केली आणि त्यांचा अनुभव शेअर केला.
UPSC परीक्षा IIT JEE पेक्षा कठीण - आनंद महिंद्रा
"बारावी फेल सिनेमा पाहिल्यानंतर मी चहुकडे पाहिलं आणि आपल्या देशातील कठीण परीक्षांबद्दल विद्यार्थ्यांशी बोललो. यामध्ये एक मुलगा आयआयटी पदवीधर होता, ज्याचा एक बिझनेस स्टार्टअपदेखील आहे. तरीही त्याने यूपीएससी परीक्षा देखील दिली होती. आयआयटी जेईईपेक्षा यूपीएससी खूप कठीण आहे, यावर त्यांनी भर दिला. त्यामुळे जागतिक क्रमवारीतील कठीण परीक्षांच्या यादीत बदल करण्याची गरज आहे", असं मत आनंद महिंद्रा यांनी व्यक्त केलं.
आनंद महिंद्रांच्या पोस्टवर IAS, IPS यांच्या प्रतिक्रिया
आनंद महिंद्रा यांच्या पोस्टनंतर सोशल मीडियातील तरुणांमध्ये वाद सुरु झाले आहेत. देशभरातील तरुण आणि IAS, IPS यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत. यूपीएससी ही देशातील सर्वात कठीण परीक्षा असल्याचं मत काहीजण व्यक्त करत आहेत, तर आयआयटी जेईई ही सर्वात कठीण परीक्षा असल्याचं काहींचं मत आहे.
एका IAS अधिकाऱ्याने म्हटलं की, UPSC अतिशय कठीण आणि सहनशक्ती तपासणारी परीक्षा आहे. तर एका युजरने म्हटलं, त्याचा UPSC मध्ये तिसरा रँक आला, तर IIT JEE मध्ये 249 वा रँक आला. एका तरुणीने तिच्या भावाचा अनुभव शेअर करताना म्हटलं, "माझ्या भावाने IIT परीक्षा पहिल्या अटेंप्टमध्ये पास केली, तर UPSC परीक्षा चौथ्या अटेंप्टमध्ये पास केली, त्यामुळे UPSC ही सर्व परीक्षांची जननी आहे."
हेही वाचा:
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI