UPSC CSE Result List : यूपीएससीचा निकाल लागला आणि टॉपर्सवर कौतुकांचा वर्षाव होऊ लागला. अनेकांच्या मुलाखतीही छापून आल्या. वरच्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या नावाची चर्चा जरी असली तरी यूपीएससीची यादी ज्या नावाने पूर्ण होतेय ते नावही आता चर्चेत आलं आहे. म्हणजे यूपीएससीच्या यादीत शेवटून पहिला असलेल्या, शेवटचा म्हणजे 1016 वा क्रमांक मिळवलेल्या महेश कुमार (Mahesh Kumar UPSC)  या उमेदवाराची एकच चर्चा सुरू आहे. महेश कुमार यांनी परिस्थितीशी झगडताना 42 व्या वर्षे हे यश मिळवलं आहे.


महेश कुमार हे मूळचे बिहारमधील मुजफ्फरपूरचे रहिवासी आहेत. ते सध्या शेखपुरा जिल्हा कोर्टात क्लर्क म्हणून काम करतात.  महेश कुमार यांच्या या यशानंतर त्यांच्या सोबत काम करणाऱ्या वकिलांमध्ये आणि सहकाऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे. महेश कुमार यांचा हा तिसरा प्रयत्न होता. पहिल्या दोन प्रयत्नात अपयश आल्यानंतर महेश कुमार यांना तिसऱ्या प्रयत्नात यश मिळालं. 


मुजफ्फरपूर जिल्ह्यातील तु्र्की खराट या गावात महेश कुमार हे आपल्या परिवारासह राहतात. कधीकाळी हा परिसर नक्षलवादी कारवायांनी प्रभावित होता. महेश कुमार यांचे वडील हे गावोगावी भटकून तांदूळ आणि डाळ विकायचे.


11 वर्षांनी 12 वी पास


महेश कुमार हे 1995 साली दहावी पास झाले. त्यांच्या शाळेत ते पहिले आले होते. पण घरची परिस्थिती अतिशय बिकट होती. त्यानंतर त्यांना शाळा सोडावी लागली. पण शिक्षणाचा ध्यास असलेल्या महेश कुमार यांनी 11 वर्षांनंतर, 2008 साली 12 वीची परीक्षा दिली आणि ते उत्तीर्ण झाले. 2011 साली त्यांनी पदवी घेतली आणि 2013 साली टीईटी (TET) परीक्षा उत्तीर्ण होऊन ते कंत्राटी पदावर शिक्षक बनले. 


महेश कुमार यांनी 2018 साली कोर्टाची परीक्षा दिली आणि क्लर्क म्हणून काम सुरू केलं.  2023 साली त्यांनी बीपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि हायस्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी धरली. 


नोकरी करत असताना महेश कुमार यांनी यूपीएससीचा ध्यास सोडला नाही. नोकरी करता करता त्यांनी यूपीएससीचा अभ्यास कायम ठेवला आणि त्याचं फळ त्यांना मिळालं. कितीही संकटं आली, कितीही संघर्ष वाट्याला आला तरी जिद्द न सोडता सातत्याने काम करत राहिल्यास यश मिळतंच हे वयाच्या 42 व्या वर्षी यूपीएससी उत्तीर्ण होऊन त्यांनी सिद्ध करून दाखवलं. 


ही बातमी वाचा :