नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी यूपीएससीचा शेवटचा प्रयत्न देणाऱ्यांना आणखी एक अतिरिक्त संधी देण्यास नकार दिला आहे. गेल्या वर्षी यूपीएससीचा आपला शेवटचा प्रयत्न दिलेल्यांना आणखी एक संधी मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती.
गेल्या वर्षी कोरोनामुळे यूपीएससीची परीक्षा देण्यामध्ये अनेकांना अडचणी आल्या होत्या. तसेच कोरोनाच्या नियमांमुळे अनेकांना परीक्षा देता आल्या नव्हत्या. काही विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना आपला शेवटचा प्रयत्न देता आला नव्हता. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना एक अतिरिक्त संधी मिळावी अशी अनेकांनी मागणी केली होती.
सर्वोच्च न्यायालयाने यूपीएससी देणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त संधी नाकारल्याने याचा परिणाम जवळपास 20 हजार विद्यार्थ्यांवर पडणार आहे. गेल्या वर्षी ऑक्टोंबर 2020 साली यूपीएससीची परीक्षा घेण्यात आली होती.
अशा विद्यार्थ्यांना एक अतिरिक्त प्रयत्न मिळावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला यावर निवेदन द्यायला सांगितलं होतं. सुरुवातीला या अशी एक संधी नाकारणाऱ्या केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात नवीन प्रतिज्ञापत्रक सादर करताना अशा विद्यार्थ्यांना आणखी एक संधी द्यायला सरकारची हरकत नसल्याचं सांगितलं होतं.
या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुरु होती. आम्ही ही याचिका फेटाळतो असे या खंडपीठातील एक न्यायमूर्ती अजय रस्तोगी यांनी सांगितलं.