नवी दिल्ली: देशात गेल्या काही दिवसापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. दिल्ली सरकारशी संबंधित सूत्रांनी सांगितलं की महाराष्ट्रासह पाच राज्यांतून सार्वजनिक वाहतूकीच्या माध्यमातून दिल्लीत येणाऱ्या लोकांना आता त्यांचा कोरोना निगेटिव्ह असलेला अहवाल सादर करावा लागणार आहे.


महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि पंजाब या पाच राज्यातून दिल्लीत प्रवेश करणाऱ्या नागरिकांना आता त्यांची RT-PCR चाचणी सादर करावी लागणार आहे. या अहवालाशिवाय संबंधित पाच राज्यांच्या नागरिकांना दिल्लीत प्रवेश करता येणार नाही.


दिल्ली सरकारने या पाच राज्यांना तशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे या राज्यातील नागरिकांना किमान 72 तासापूर्वीचा RT-PCR सादर करावा लागणार आहे.


लग्न सोहळ्याचा व्हिडीओ पोलिसांना पाठवणे बंधनकारक, ठाणे पोलिसांचे लग्न सोहळ्यांसाठी कडक निर्बंध


दिल्ली सरकारचा हा निर्णय फ्लाइट, ट्रेन आणि बसच्या (सार्वजनिक वाहतूक) माध्यमातून प्रवास करणाऱ्यांसाठी लागू होणार आहे. पण जर खासगी गाडी वा कारने प्रवास करत असलेल्या प्रवाशांना हा नियम लागू होणार नाही. दिल्ली सरकारचा हा आदेश 26 फेब्रुवारीपासून ते 15 मार्चपर्यंत लागू असणार आहे अशी माहिती आहे.


देशात कोरोना नियंत्रणात येत असल्याचं दिसत असतानाच अलिकडे काही दिवसात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. सध्या भारतात सध्या 1.36 टक्के इतके रुग्ण सक्रिय आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र, केरळ, पंजाब, छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि जम्मू कश्मीर या सहा राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अलिकडे वाढलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येपैकी 90 टक्के रुग्ण केवळ या सहा राज्यांत आहेत. त्यामुळे या सहा राज्यांतील कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने आवश्यक ते मार्गदर्शक तत्वं जारी केले आहेत.


Corona: गेल्या चोवीस तासात देशात दहा हजार नवे रुग्ण, केवळ सहा राज्यांत 90 टक्के संख्या