नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षेत (सीएसई) आपल्या अंधत्वावर मात करत जयंत मंकले या विद्यार्थ्याने यश मिळवलं. मात्र त्याच्या अंधत्वामुळे त्याला डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग (डीओपीटी) ने नियुक्ती नाकारली. या दिशेने आता एक सकारात्मक पाऊल पुढे पडलं आहे. डीओपीटी मंत्री जितेंद्र सिंह यांच्यासोबत सोमवारी बैठक होणार असून या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाईल.


एबीपी माझाने जयंत मंकलेची बातमी दाखवली होती. याची दखल घेण्यात आली आहे. जयंत मंकलेने विनय सहस्त्रबुद्धे यांचीही भेट घेतली, त्यांनी जयंतच्या जिद्दीचं आणि मेहनतीचं कौतुक करत लवकरच नियुक्ती मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचं सांगितलं.

''जयंतच्या नियुक्तीसाठी डीओपीटीकडून काही अडथळे आले. मात्र ते लवकरच क्लिअर केले जातील. त्याला त्याच्या मित्रांनी अनेक प्रकारे मदत केली आहे,'' असं म्हणत विनय सहस्त्रबुद्धे यांनी जयंतचं कौतुकही केलं.


गेल्या वर्षी झालेल्या नागरी सेवा परीक्षेत जयंत मंकलेने देशात 923 वा क्रमांक मिळवला. यूपीएससीकडून परीक्षा घेताना दृष्टीहीन विद्यार्थ्यांमध्ये कमी अंधत्व, पूर्ण अंधत्व असा भेदभाव करत नाही. मात्र डीओपीटीकडून नियुक्ती देताना भेदभाव केल्याचं समोर आल्याने संताप व्यक्त करण्यात येत होता.

एबीपी माझाने सातत्याने या बातमीचा पाठपुरावा केला आणि सत्ताधाऱ्यांपर्यंत ही गोष्ट पोहोचवली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही जितेंद्र सिंह यांना याबाबत विनंती केली होती.


संबंधित बातम्या :

नवी दिल्ली | अंधत्वावर मात करत जयंतचं यूपीएससीत यश, नियुक्तीसाठी संघर्ष सुरुच


अंधत्वावर मात करत जयंतचं यूपीएससीत यश, नियुक्तीसाठी संघर्ष सुरुच