आगरा : उत्तर प्रदेशातील आग्य्रात एक अजब प्रकरण समोर आलं आहे. महिनाभर काम करुनही तरुणाला केवळ सहा रुपये पगार मिळाला. यामुळे निराश झालेल्या तरुणीने कारखान्यातच गळफास घेतला. मात्र वेळीच लक्ष गेल्याने इतर कर्मचाऱ्यांनी त्याला वाचवलं.


सिकंदरामधील एका चप्पल कारखान्यात ही घटना घडली आहे. सिकंदरा पोलिस स्टेशनचे एसएचओ अजय कौशल यांच्या माहितीनुसार, "हा तरुण कारखान्यात अनेक वर्ष काम करत होता. अनेक दिवसांपासून तो डिप्रेशनमध्ये होता. 27 जुलैला त्याचा अपघात झाला होता. उपचारांसाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच्या उपचारांचा खर्च कारखान्याच्या मालकाकडून करण्यात आला. तब्येत सुधारल्यानंतर तरुण कारखान्यात कामावर परतला. यावेळी त्याने आपला पगार मागितल्यानंतर मालकाने त्याला केवळ सहा रुपये दिले."

'घरखर्च कसा भागणार?'
एसएचओ म्हणाले की, "माझ्या इलाजासाठी जो खर्च झाला, ते पैसे हफ्त्यांमध्ये घ्या, अशी विनंतर तरुणाने आपल्या मालकाला केली होती. परंतु मालकाने त्याची विनंती मान्य केली नाही. तरुण वारंवार विनंती करत होता आणि मालक ती फेटाळत होता. यामुळे तरुण फारच दबावात होता. घरखर्च कसा भागणार ही चिंता त्याच्या मनात येत होती."

"बुधवारी कारखान्यात आल्यानंतर तरुणाने सिलिंग फॅनला लटकून गळफास घेतला. मात्र कारखान्यात काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांची नजर त्याच्यावर गेली. तातडीने त्यांनी तरुणाला फासावरुन खाली उतरवून रुग्णालयात नेलं. त्याची प्रकृती स्थिर असल्याचं कळतं," असंही पोलिसांनी सांगितलं.

पोलिसांच्या हस्तक्षेपाने प्रकरण सुटलं
तर दुसरीकडे पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे तरुण आणि कारखाना मालकामधील वाद सुटला. उपचारांचा खर्च हफ्त्याने घेण्यास कारखान मालक राजी झाला. कोणीही एफआयआर दाखल केलेली नाही.