केंद्रीय महिला बालकल्याण मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या की, "राहुल गांधींनी महिलाचा अपमान केला आहे. गांधी कुटुंबातील व्यक्तीचं हे वक्तव्य लाजीरवाणं आहे." "लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधी यांच्याविरोधात कारवाई करावी," अशी मागणीही त्यांनी केली.
दुसरीकडे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही राहुल गांधींच्या वक्तव्यावर टीका केली आहे. "मला अतिशय दु:ख झालं आहे, संपूर्ण देशाला दु:ख झालं आहे. अशा शब्द वापरणारे लोक सभागृहात येऊ शकतात का? त्यांनी संपूर्ण सभागृहाचीच नाही तर संपूर्ण देशाची माफी मागायला हवी," असं राजनाथ सिंह म्हणाले.
राहुल गांधी काय म्हणाले होते?
देशात होत असलेल्या बलात्कारांच्या घटनांबाबत राहुल गांधींनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. झारखंडमधील निवडणूक प्रचारसभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले होते की, "मोदींचा मेक इन इंडिया आता रेप इन इंडिया बनला आहे. झारखंड आणि उत्तर प्रदेश कुठेही पाहा, अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. भाजपच्या एका आमदारावरही बलात्काराचा आरोप आहे. एवढंच नाही तर पीडितेला जाळून मारलं पण मोदींनी मौन साधलं आहे."
"मोदींनी 'बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ' असा नारा दिला. पण मुलींचं रक्षण करणार कोण? आज मुलींना भाजपच्या आमदारांपासून वाचवण्याची गरज आहे," असं राहुल गांधी म्हणाले. तसंच भाजपचे नेते 24 तास देशाची वाटणी करण्यात घालवतात. त्यांचा संपूर्ण दिवस धर्माच्या आधारावर लोकांमध्ये भांडण लावण्याचं षडयंत्र रचण्यात जातो. याचवेळी उद्योजक अदानी आणि अंबानी यांना देशाचा पैसा देण्याचंही काम करत आहेत," असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.