नवी दिल्ली : संस्कृत भाषेचे अनेक फायदे नेहमीच सांगितले जातात. परंतु भाजपच्या एका खासदाराने संस्कृतचे फायदे सांगताना अत्यंत हास्यास्पद वक्तव्य केलं आहे. मध्य प्रदेशमधील सतना मतदारसंघाचे खासदार गणेश सिंह यांनी संस्कृतचे फायदे सांगताना दावा केला आहे की, संस्कृत बोलल्यामुळे मज्जासंस्थेला चालना मिळते. तसेच यामुळे मधुमेह (डायबिटीस) आणि कोलेस्ट्रॉलही दूर राहतो. यावेळी सिंह यांनी अमेरिकेतील एका शैक्षणिक संस्थेच्या संशोधनाचा दाखला दिला. गुरूवारी लोकसभेत केंद्रीय संस्कृत विद्यापीठ विधेयक 2019 वर चर्चा सुरु होती. यावेळी सिंह यांनी संस्कृत भाषेबाबत हास्यास्पद दावे केले.


सिंह यांनी यावेळी अमेरिकन अंतराळ संशोधन केंद्राच्या(नासा) कथित अहवालाचा दाखला दिला. सिंह म्हणाले की, नासाच्या मते संगणक प्रोग्रामिंग संस्कृतमध्ये केलं गेलं तर ते सध्याच्या प्रणालीपेक्षा अधिक परिणामकारक आणि कार्यक्षम ठरेल. सिंह म्हणाले की, संस्कृत ही सर्वोत्तम भाषा आहे. देशातील 97 टक्के भाषा या संस्कृतवर आधारित आहेत आणि त्यामध्ये काही इस्लामिक भाषांचाही समावेश आहे. या भाषांचं मूळ हे संस्कृतमध्येच आढळतं.

दरम्यान केंद्रीय मंत्री प्रताप चंद्र सारंगी यांनी बिलाबाबत बोलताना संस्कृत भाषा निवडली. संस्कृत भाषेत सारंगी म्हणाले की, संस्कृत भाषा खूपच लवचिक आहे. या भाषेत एक वाक्य अनेक प्रकारे बोलले जाऊ शकते. इंग्रजीमधले ब्रदर (भाऊ) काऊ (गाय) हे शब्द संस्कृतमधूनच घेतले आहेत. सारंगी म्हणाले की, संस्कृतसारख्या प्राचीन भाषेचा प्रचार केल्यामुळे इतर भाषांवर कोणताही परिणाम होणार नाही.