नवी दिल्ली : भारतीय पासपोर्टवर कमळाच्या चिन्हावरुन सध्या जोरदार वाद सुरु आहे. हा मुद्दा काल (12 डिसेंबर) संसदेत गाजला. विरोधकांनी यावरुन मोदी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. सुरक्षा मानक अधिक मजबूत करण्यासाठी कमळाचं चिन्ह लावल्याचं मंत्रालयाचं म्हणणं आहे.


केरळच्या कोझीकोडमध्ये कमळाचं चिन्ह असलेले पासपोर्ट दिल्याचा मुद्दा काँग्रेस खासदार एम के राघवन यांनी काल (12 डिसेंबर) लोकसभेत शून्य प्रहरादरम्यान उपस्थित केला होता. एका वृत्तपत्राने याबाबत वृत्त दिल्याचं त्यांनी सभागृहात सांगितलं. "कमळाचं चिन्ह असलेलं पासपोर्ट म्हणजे सरकारी संस्थांचं भगवीकरण करण्याचा प्रयत्न आहे, कारण कमळ हे भाजपचं निवडणूक चिन्हं आहे," असं एम के राघवन म्हणाले.

लोकसभेत हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी सांगितलं की, "बनावट पासपोर्ट ओळखण्यासाठी आणि पासपोर्टचे सुरक्षा मानक अधिक बळकट करण्यासाठी कमळाचं चिन्हं लावलं आहे.

ते म्हणाले की, हे चिन्ह म्हणजेच कमळ आपलं राष्ट्रीय फूल देखील आहे. कमळाव्यतिरिक्त आणखी बरीच चिन्हं आहेत. टप्प्याटप्प्याने इतर राष्ट्रीय चिन्हांचाही वापर केला जाईल. आता कमळ आहे आणि पुढील महिन्यात आणखी काहीतरी असेल. भारताशी संबंधित चिन्हांचाच जसं की राष्ट्रीय फूल, राष्ट्रीय पशू यांचा पासपोर्टवर वापर होईल.  ICAO च्या नियमावलीअंतर्गत हे बदल करण्यात आले आहेत."