मुंबई : पाच राज्यांच्या निवडणूक निकालाला शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी सलामी दिली आहे. आज तीन दिवसांच्या सुटीनंतर शेअर बाजार सुरू झाला तेव्हा अपेक्षेप्रमाणेच निफ्टी आणि सेन्सेक्स या दोन्ही निर्देशांकांनी मोठी उसळी घेतली.
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये सकाळच्या सत्रात तर सर्वोच्च पातळी गाठत, 600 पॉईंटचा टप्पा गाठला, निफ्टीमध्ये आता 125 ते 130 च्या आसपास वाढ आहे. तर मुंबई शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये 450 ते 500 पॉईंटची वाढ पाहायला मिळत आहे.
सध्या निफ्टी 9066 अंशावर तर सेन्सेक्स 29398 पॉईंटवर आहे.
9066 ही निफ्टीची आजवरची सर्वोच्च पातळी आहे.
पाच राज्यातले निवडणूक निकाल त्यातही उत्तर प्रदेशच्या अतिप्रचंड निकालामुळे सत्ताधारी भाजपला राज्यसभेतही बहुमत मिळवणं शक्य होणार आहे. राज्यसभेत पंतप्रधान मोदींना बहुमत मिळाल्यास मोठ्या कालावधीपासून प्रलंबित असलेल्या आर्थिक सुधारणा राबवण्यासाठी चालना मिळेल अशी बाजाराला अपेक्षा आहे. त्यामुळेच उत्तर प्रदेशसह अन्य चार राज्यातील निवडणूक निकालाला गुंतवणूकदारांनी दिलेली सलामी म्हणून या उसळीकडे पाहिलं जात आहे.
या सर्व घडामोडीचा परिणाम म्हणून अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाही गेल्या वर्षभरातील सर्वोच्च पातळीवर आला आहे. रुपयातील ही सुधारणा हे सुद्धा बाजाराच्या उत्साहाचं प्रमुख कारण मानलं जातंय. शुक्रवारच्या बंदनंतर आज डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात तब्बल 43 पैशांची सुधारणा झाली आहे.
विधानसभा निवडणूक निकालामुळे बाजाराला आणि त्यातील गुंतवणूकदारांना अपेक्षित असलेलं राजकीय स्थैर्य अधिक भक्कम झालं आहे.