नवी दिल्ली : रंगांचा सण होळी उत्सवाचा उत्साह केवळ देशभरातच नव्हे, तर परदेशातही पाहायला मिळाला. देशाच्या विविध भागांसोबतच भारतीय जवानांनी रंगांची उधळण करुन होळी साजरी केली. तर पाकिस्तानातही होळीचा उत्सव दणक्यात साजरा करण्यात आला.



जम्मू-काश्मीरमध्ये बीएसएफचे जवान होळीच्या रंगात रंगलेले पहायला मिळाले. पूँछमध्ये जवानांनी मोठ्या उत्साहात होळी साजरी केली. एकमेकांना रंग लावून होळीचा उत्साह द्विगुणीत करण्याचा प्रयत्न जवानांनी केला. यावेळी जवानांनी भारतीय नागरिकांना होळीच्या शुभेच्छाही दिल्या.



तर दुसरीकडे भारत - बांगलादेशच्या सीमेवर होळीचा सण साजरा करण्यात आला. अगरातळा-अखवारा चेक पोस्टवर भारतीय जवान आणि बांगलादेशच्या जवानांनी एकमेकांना मिठाई वाटत होळीच्या शुभेच्छा दिल्या. सीमाभागात सहकार्य वाढवण्यासाठी होळीचा सण महत्वाचा असल्याची भावना दोन्ही देशांच्या सैनिकांनी व्यक्त केली.



विशेष म्हणजे, पाकिस्तानच्या कराचीतही मोठ्या उत्साहानं होळी साजरी केली गेली.  कराचीत असलेल्या स्वामीनारायण मंदिराच्या परिसरात हा सण साजरा झाला. यावेळी पाकिस्तानातील हिंदूंसोबतच मुस्लिम बांधवांनीही सहभाग घेऊन रंगांची उधळण केली.

गुजरातच्या सुरतमध्ये जळणाऱ्या होळीवर अनवाणी चालून लोकांनी होळी साजरी केली. सुरतच्या ओलपाडमधील गावात होळी पेटवली जाते. त्यानंतर होळीतील जळत्या निखाऱ्यांवर गावातील लोक चालतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जळत्या निखाऱ्यांवर चालूनही कोणतीही इजा होत नसल्याचा दावा इथल्या लोकांनी केला.