नवी दिल्ली : प्रधानमंत्री उज्ज्वला योजने अंतर्गत महिलांना सर्वाधिक गॅस कनेक्शन देण्यात उत्तर प्रदेशने बाजी मारली आहे. तर पश्चिम बंगाल दुसऱ्या क्रमांकावर आहे. इंडियन ऑईलचे कार्यकारी संचालक ए. के. वर्मा यांनी ही माहिती दिली.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 1 मे 2016 रोजी सुरु करण्यात आली. या अंतर्गत उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत 46 लाख गरीब कुटुंबाना स्वस्त गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले. तर पश्चिम बंगालमध्ये 19 लाख आणि मध्य प्रदेशमध्ये 17 लाख स्वस्त गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले.
उत्तर प्रदेशमध्ये 35 टक्के गॅस कनेक्शन अनुसूचित जाती आणि जमातींसाठी वाटण्यात आले, अशी माहितीही वर्मा यांनी दिली. त्यामुळे या कुटुंबातील महिलांना आता चुल्हीपासून मुक्ती मिळून गॅस स्वयंपाकासाठी गॅसचा वापर करता येत आहे.
काय आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना?
केंद्र सरकारने महिलांची चुल्हीच्या धुरापासून मुक्ती करण्यासाठी 1 मे 2016 रोजी ही योजना लाँच केली. ग्रामीण भागात या योजने अंतर्गत 5 कोटी महिलांना स्वस्त गॅस कनेक्शन वाटप करण्याचं ध्येय ठेवण्यात आलं आहे.
इंधनाचा वापर कमी करणं, महिलांना धुरामुळे होणारे विविध आजार रोखणं, धुरामुळे घरात होणारं प्रदूषण रोखणं ही या योजनेची ध्येयं आहेत.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ कसा घ्याल?
बीपीएलधारक महिला या योजनेसाठी अर्ज करु शकतात. या अर्जामध्ये पत्ता, जन धन खाते क्रमांक, आधार क्रमांक अशा माहितीची गरज असते. अर्जधारकाला कोणत्या प्रकारचं म्हणजे किती किलोचं सिलेंडर पाहिजे, याचाही अर्जामध्ये उल्लेख करणं गरजेचं आहे.
अर्ज ऑनलाईन किंवा जवळच्या गॅस एजन्सीमधून मिळवता येईल. ऑनलाईन अर्ज डाऊनलोड केल्यास तो महत्वाच्या कागदपत्रांसह भरुन जवळच्या गॅस एजन्सीमध्ये जमा करणं गरजेचं आहे. बीपीएल प्रमाणपत्र, बीपीएल रेशन कार्ड, आधार कार्ड किंवा मतदान कार्ड आणि एक पासपोर्ट फोटो अशी कागदपत्र असणं गरजेचं आहे.
प्रधानमंत्री उज्वला योजनेसाठी पात्रता
अर्जधारकाचं 2011 च्या सामाजिक-आर्थिक जनगनणेच्या यादीत नाव असणं गरजेचं आहे. अर्जधारक ही 18 वर्षांवरील महिला असावी. अर्जधारक महिलेचं राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खातं असावं. आणि महत्वाचं म्हणजे अर्जदार महिलेच्या नावावर याअगोदर एखादं गॅस कनेक्शन नसावं.