मेरठ : एन्काऊंटरवेळी बंदूक बंद पडल्यावर तोंडाने 'ठांय ठांय' असा फायरिंगचा आवाज काढणाऱ्या उत्तर प्रदेश पोलीस दलातील उपनिरीक्षकाचा पुरस्काराने गौरव होणार आहे. पोलीस उपनिरीक्षक मनोज कुमार यांनी एन्काऊंटरवेळी प्रसंगावधान दाखवल्याचं उत्तर प्रदेश पोलिसांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची शौर्य पुरस्कारासाठी शिफारस केली जाणार आहे.
काय आहे प्रकरण?
संभलमध्ये 13 ऑक्टोबर रोजी पोलीस आणि गुंडांमध्ये चकमक झाली होती. त्यावेळी एका शेतात लपून बसलेल्या गुंडांवर पोलिसांची कारवाई सुरु होती. त्यावेळी, अचानक पोलीस अधिकाऱ्याजवळ असलेली बंदूक बिघडली. बंदूक जाम झाल्याने त्यातून गोळी सुटत नव्हती. त्यामुळे बंद पडलेली बंदुक घेत पोलीस उपनिरीक्षक मनोज कुमार यांनी तोंडातून फायरिंगचा आवाज काढला.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. पोलिसाची खिल्लीही उडवली जात होती. मात्र सहकाऱ्यांनी उपनिरीक्षक मनोज कुमार यांच्या साहसाचं कौतुक केलं. त्यांनी हिरोसारखं काम केलं. पोलीस दल याकडे सकारात्मकपणे पाहतं. उपनिरीक्षकांची बंदूक जाम झाल्यानंतर आपल्या सहकाऱ्यांच्या मनोधैर्यावर परिणाम होऊ नये, म्हणून त्यांनी तोंडातून ठांय-ठांय असा आवाज काढला, असं पोलीस अधीक्षक यमुना प्रसाद यांनी सांगितलं.
पोलीस आणि गुंडांच्या या चमकीवेळी पोलिसांच्या दुसऱ्या पथकाने एका गुंडांच्या पायावर गोळी झाडून त्याला पकडलं. मात्र, अचानक बंदूक बंद पडल्यानंतर मनोज कुमार यांनी दाखवलेल्या हुशारीची जोरदार चर्चा झाली. आता गुन्हेगाराला पकडण्यासाठी तोंडातून 'ठांय ठांय' आवाज काढणाऱ्या उपनिरीक्षकाचा पुरस्काराने गौरव होणार आहे.
चकमकीवेळी तोंडातून ठांय-ठांय आवाज काढणाऱ्या पोलिसाला शौर्य पुरस्कार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Oct 2018 04:57 PM (IST)
बंदूक जाम झाल्याने त्यातून गोळी सुटत नव्हती. त्यामुळे बंद पडलेली बंदुक घेत पोलीस उपनिरीक्षक मनोज कुमार यांनी तोंडातून फायरिंगचा आवाज काढला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -