मंगळवारी, एमनेस्टी इंडियाने एक ट्विट करुन काही आकडे सादर करत उत्तर प्रदेश पोलीस कायद्याचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप केला. पण त्याला चोख प्रत्युत्तर उत्तर प्रदेश पोलिसांनी दिल्यानंतर एमनेस्टी इंडियाला आपलं ट्वीट तात्काळ मागे घ्यावं लागलं. शिवाय, यानंतर सुधारीत आकडेवारीद्वारे नवीन ट्वीट केलं.
एमनेस्टी इंडियाने सुरुवातीला केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं की, “मार्च 2017 पासून ते जानेवारी 2018 पर्यंत उत्तर प्रदेशात पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये तब्बल 900 जणांचा मृत्यू झाला. राज्यातील सरकार पोलीस कायद्याचा गैरवापर करत आहेत.”
यावर उत्तर प्रदेश पोलिसांनी एमनेस्टी इंडियाच्या ट्वीटला चोख प्रत्युत्तर दिलं. “तुमच्या आकडेवारीत मोठी ‘मानवीय’ चूक आहे. तुम्ही जखमी आणि मृत झालेल्यांना एकच समजत आहात. वास्तविक, या काळात एन्काऊंटरच्या कारवायांमध्ये 37 जणांचा मृत्यू झाला. तुम्ही जिवंत व्यक्तींचा सन्मान राखावा ही आमची तुम्हाला विनंती आहे. आम्ही यावर रिसर्च करुन लवकरच कायदेशीर नोटीस पाठवू.”
पोलिसांच्या या ट्वीटनंतर एमनेस्टी इंडियाने आपलं जुनं ट्वीट तात्काळ मागे घेत, नवीन सुधारित ट्वीट केलं. त्यात म्हटलं होतं की, “जुन्या ट्वीटमध्ये आम्ही 900 जणांचा एन्काऊंटर झाल्याचं म्हटलं होतं. पण यात आम्ही सुधारणा करु इच्छितो. आम्हाला हे सांगायचं आहे की, मार्च 2017 ते जानेवारी 2018 दरम्यान उत्तर प्रदेश पोलिसांच्या कारवाईत 900 जणांचा मृत्यू झाला की, ते जखमी झाले?”
दरम्यान, उत्तर प्रदेश पोलिसांनी मार्च 2017 ते जानेवारी 2018 या काळात तब्बल 1142 एन्काऊंटरच्या कारवाया केल्या. यात 37 जणांचा मृत्यू झाला. राज्यातील गुन्हेगारीचा नायनाट करण्यासाठी राज्य पोलिसांनी ही कारवाई सुरु केली होती.