मुस्लिमांनी भारतात राहू नये, भाजप खासदार विनय कटियारांचं वक्तव्य
एबीपी माझा वेब टीम | 07 Feb 2018 01:05 PM (IST)
विनय कटियार हे विश्व हिंदू परिषदेची यूथ विंग असलेल्या बजरंग दलाचे संस्थापक आहेत.
नवी दिल्ली : मुस्लिमांनी भारतात राहू नये, तर थेट पाकिस्तान किंवा बांगलादेशात जावं असं वक्तव्य भाजप खासदार विनय कटियार यांनी केलं आहे. भारतीय मुस्लिमांना पाकिस्तानी संबोधणाऱ्या व्यक्तींना तुरुंगात टाकण्याच्या ओवेसींच्या मागणीला उत्तर देताना कटियार यांनी वाद ओढवून घेतला आहे. 'मुस्लिमांनी या देशात राहता कामा नये. लोकसंख्येच्या आधारावर त्यांनीच आपल्या देशाचं विभाजन केलं. मग त्यांना इथे राहण्याची गरजच काय? त्यांना स्वतंत्र प्रदेश देण्यात आला आहे. त्यांनी पाकिस्तान किंवा बांगलादेशमध्ये जावं. त्यांचं इथे काम काय?' असं विनय कटियार म्हणाले. विनय कटियार हे विश्व हिंदू परिषदेची यूथ विंग असलेल्या बजरंग दलाचे संस्थापक आहेत. 'वंदे मातरम् चा आदर न करणाऱ्या, राष्ट्रध्वजाचा अवमान करणाऱ्या आणि पाकिस्तानी झेंडा फडकवणाऱ्या व्यक्तींना शिक्षा देण्याची तरतूद करावी' अशी मागणीही कटियार यांनी केली. 'धर्माच्या नावाखाली मुस्लिमांनी देशाची फाळणी केली' अशी टीकाही विनय कटियार यांनी केली.