जयपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून विभक्त राहणाऱ्या पत्नी जशोदाबेन यांच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात कारचा चक्काचूर झाला, मात्र सुदैवाने जशोदाबेन यांना गंभीर दुखापत झालेली नाही.
जशोदाबेन नातेवाईकाच्या लग्नासाठी राजस्थानातील कोटामध्ये गेल्या होत्या. तिथून परत येताना चित्तोडगडजवळ हा अपघात झाला. या अपघातात त्यांचे नातेवाईक वसंतभाई मोदी गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातानंतर स्थानिकांनी जशोदाबेन यांना तात्काळ चित्तोडगड रुग्णालयात दाखल केलं. त्यांच्या डोक्याला आणि हाताला मार लागल्याची माहिती आहे. जशोदाबेन यांची प्रकृती ठीक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
जशोदाबेन त्यांच्या भावासोबत मेहसाणा जिल्ह्यातील उंझा गावात राहतात. त्यांना मेहसाणा पोलिसांकडून सुरक्षा पुरवली जाते.