UP Hathras Stampede Tragedy: उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) हाथरस (Hathras Tragedy) येथे सत्संगच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्यांचा आकडा आता 121 वर पोहोचला आहे. आतापर्यंत मृत्यू झालेल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. हाथरस येथील रतिभानपूर गावात ही घटना घडली. हाथरसमधील एका गावात साकार विश्व हरी भोले बाबा यांचं सत्संग आयोजित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला हजारो अनुयायी उपस्थित होते. सत्संगदरम्यान या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. त्याचवेळी चेंगराचेंगरी झाली, जमलेले लोक एकमेकांना तुडवत होते. या घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढणार आहे. 


हाथरसमधील मृतांचा आकडा एवढा मोठा आहे की, रुग्णालयातील शवाघरांमध्ये अजिबात जागा शिल्लक राहिलेली नाही. रुग्णालयाच्या आसपासच्या परिसरांत मृतदेहांचा ढिग पडला आहे. घटनास्थळावरुन मृतदेह जखमी आणि मृतांना बस आणि टेम्पोमध्ये भरुन सिंकदराऊ सीएचसी आणि एटा जिल्ह्यातील रुग्णालयात पाठवण्यात आलं. एटा मेडिकल कॉलेजमध्ये मृतदेहांचा खच पाहून काळीज पिळवट होतं. अशातच घटनेवेळी कर्तव्यावर असलेल्या एका पोलिसाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे. 




हाथरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत अनेकजण किड्या मुंग्यांसारखे चेंगरुन गेले. अशातच सर्व मृतदेह गाड्यांमध्ये भरुन रुग्णालयात नेले जात होते. तसेच, घटनेची माहिती मिळताच अनेकांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. रुग्णालयाच्या आसपासच्या परिसरात नातेवाईकांच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या. या परिस्थितीचं विदारक दृश्य पाहून कर्तव्यावर असलेल्या एका पोलिसाला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळत आहे.  क्युआरटीच्या ड्युटीवर असलेले पोलीस शिपाई रवी यादव यांचं तीव्र हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे. रवी यादव यांची ड्युटी मृचदेहांची व्यवस्था करण्यात लावण्यात आली होती. याबाबत माहिती देताना पोलिस अधीक्षक जगदीश चंद्र मौर्य यांनी सांगितलं की, शिपाई रवी यादव यांची ड्युटी हाथरस दुर्घटनेत मृतदेहांच व्यवस्था करण्यात लावण्यात आली होती. ड्युटी दरम्यानच त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्यांचा मृत्यू झाला. 


हाथरसमध्ये किड्यामुंग्यांसारखं चिरडून 121 जणांचा मृत्यू 


उत्तर प्रदेशच्या हाथरस येथे एका सत्संगाच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन शंभरहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. मृतांमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांसह लहान मुलांचाही समावेश आहे. हाथरस येथील रतिभानपूर गावात ही घटना घडली. या गावात साकार विश्व हरी भोले बाबा यांचा संत्सग आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला साकार विश्व हरी यांचे हजारो अनुयायी उपस्थित होते. यामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. या कार्यक्रमाला स्थानिक प्रशासनानं परवानगी देखील दिली होती. दरम्यान, सत्संग सुरू असताना चेंगराचेंगरीची घटना घडली. ज्यामध्ये 120 हून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे.